Satara News : ... तर सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन


संयुक्त विद्यार्थी संघटनेचा सरकारला १० जूनपर्यंतचा अल्टिमेटम

Satara News : कोरोनाची महाभयंकर परिस्थिती पाहता महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द कराव्यात तसेच ट्यूशन फी मध्ये ५० टक्के सवलत मिळावी यासाठी सुमारे ४० लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मंत्रीमहोदयांकडे शिफारस करूनदेखील अद्यापही त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. जर १० जूनपर्यंत सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही तर समस्त विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असा इशारा संयुक्त विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे यांनी दिला आहे.

संघटनेच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कचरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा इशारा दिला आहे. कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीची पार्श्वभूमी पाहता महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी तसेच ट्यूशन फी मध्ये ५० टक्के सवलत मिळण्यासाठी गेले आठ ते नऊ महिने संयुक्त विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी वैयक्तिक पातळीवर आणि एक ते दीड महिना संघटनात्मक पातळीवर सातत्याने लढा देत आहेत. 

बैठकीचे आश्वासन पाळले नाही

अशा प्रकारची चळवळ सुरू करत असताना जवळपास ४० हून अधिक लोकप्रतिनिधींसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेटून चर्चा केली. चर्चेदरम्यान बहुतांशी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिफारसदेखील केली.

दरम्यानच्या काळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, प्रदेश महासचिव संकेत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील पवार यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेत परिस्थितीची आणि संघटनेच्या मागणीची विस्तृत माहिती दिली. यावर मंत्रिमहोदयांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही कसल्याही प्रकारची बैठक आयोजित झाली नाही. 

चर्चेअंती आंदोलनाची भूमिका जाहीर

दरम्यान दि. ४ मे २१ रोजीच्या संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या झालेल्या बैठकीत चर्चेअंती जर दि. १० जूनपर्यंत सरकारद्वारे कोणताही निर्णय घेण्यात आला नाही तर समस्त विद्यार्थी वर्गासह संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीतनंतर जाहीर केली आहे.

या बैठकीस सातारा जिल्हा युवती जिल्हाध्यक्ष सुनीता जाधव - बाबर, कराड तालुका अध्यक्ष कोमल चव्हाण, कार्याध्यक्ष कला शाखा रेणुका कोळी, प्रवक्ता वाणिज्य शाखा ईश्वरी देव, संघटक अभियांत्रिकी शाखा अस्मिता जाधव उपस्थित होत्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या