पोलिसांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
Police News : महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करतात. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात पोलीस हे रस्त्यांवर उतरून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन नागरिकांकडून करुन घेतात. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस ठाणे व वसाहतीचे ई-भूमिपूजन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या ई - भूमिपूजन समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार (ऑनलाईन), गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील (ऑनलाईन), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील (ऑनलाईन), पोलीस महासंचालक संजय पांडे (ऑनलाईन), पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर (ऑनलाईन), विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह (ऑनलाईन), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (ऑनलाईन), जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण केंद्रांमुळे मनोबल वाढते
पोलिसांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी पोलीस ठाण्याच्या जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची घरे असणे खूप गरजेचे आहे, असे सांगून, पोलिसांसाठी विभागवार प्रशिक्षण केंद्र असले पाहिजे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलिसांची शारीरिक क्षमता व मनोबल वाढण्यास चांगली मदत होते. अशा प्रशिक्षणामुळेच आज महाराष्ट्र पोलीस देशात सर्वोत्तम आहेत, ते जगात सर्वोत्तम होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोयनानगर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात यावे, असे आदेश उध्दव ठाकरे यांनी दिले.
कोरोनाचा मुकाबला करताना अनेक पोलिसांचे मृत्यू झाले, बरेच बाधित झाले. जे बाधित होवून बरे झाले त्यांनी तात्काळ हजर होवून आपले कर्तव्य बजावले. पोलीस विभागाला दिलासा देण्याचे व त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम राज्य शासन करीत आहे. अहोरात्र काम करत असलेल्या पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
काम दर्जेदार करण्याच्या सूचना
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मल्हारपेठ हे बाजारपेठेचे महत्वाचे गाव आहे. येथील लोकसंख्याही वाढली आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी राज्य शासनाने इथे पोलीस ठाणे व वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस ठाण्याबरोबरच वसाहतीचेही काम वेळेत आणि दर्जेदार करा. पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे राज्यात चांगले काम सुरु आहे त्यात सातत्य ठेवा. कोरोना संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यू व बाधित झालेल्या पोलिसांसाठी ५० लाखाचे संरक्षण तसेच ५५ वर्षावरील पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्डवर्क न देता कार्यालयातील काम देण्याचा चांगला निर्णय घेतला. वर्क
पोलिसांना चांगल्या सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. कोरोना संकट काळात सातारा पोलीस दलाने रस्त्यावर उतरुन उत्कृष्ट असे काम केले. सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करुन पवार यांनी मल्हारपेठ पोलीस ठाणे व वसाहतीला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी दिले.
आणखी चांगले उपक्रम राबवणार
जिल्ह्याच्या विकास कामांना नेहमीच राज्य शासनाचे सहकार्य राहिले आहे. येत्या १८ महिन्यात पोलीस ठाणे व वसाहत पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. पोलीस विभागासाठी भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. मल्हारपेठ येथे पोलीस ठाणे व्हावे यासाठी १९९५ पासून प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने याला मान्यता देवून पोलीस ठाणे व वसाहतीसाठी निधी उपलब्ध करुन दिला. कोयनानगर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव तयार केला असून या प्रस्तावालाही मान्यता द्यावी. अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी ७०० कोटींपेक्षा जास्त रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या