झाडाखाली पडलेली, पक्ष्यांनी खाल्लेली फळे खाणे टाळण्याचे केले आवाहन
Satara News : महाबळेश्वर येथील वटवाघळांमध्ये निपाह रोगाचे विषाणू आढळल्याचा अहवाल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र या विषाणूचे माणसाच्या शरीरात संक्रमण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे, नागरिकांनी घाबरुन न जाता झाडाखाली पडलेली, पक्ष्यांनी खाल्लेली फळे खाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेखर सिंह यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव, मेडिकल कॉलेजची प्रक्रिया, निपाह रोगाचे विषाणू, कोरोना चाचणी आदींविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज
शेखर सिंह म्हणाले, देशभरात निपाह रोगाचे विषाणू आढळल्याच्या घटना आहेत. या घटनांमुळे भीतीदायक वातावरण निर्माण करु नये. निपाह विषाणूबाबत राज्य शासनाने अद्याप कोणतेही निर्देश दिले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात नियंत्रणात आला असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ६.६९ टक्के आला आहे. तसेच जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत १४३ रुग्ण, तर २६ मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय कोरोनाचा डेल्टा संक्रमणातील कोणताही रुग्ण सातारा जिल्ह्यात आढळलेला नाही. संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: सज्ज असून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कटाक्षाने पालन करावे.
तूर्त पानमळेवाडी येथे व्यवस्था
सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तपासणी दौऱ्यासाठी पर्याप्त पयाभूत सुविधा व पदभरतीची तांत्रिक प्रक्रिया राबविली जात आहे. सातारा सिव्हिल हॉस्पिटलची मुख्य इमारत व जम्बो हॉस्पिटलचा विस्तारित भाग मेडिकल कॉलेजसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे. पुणे, मिरज, सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहयोगी प्राध्यापकांना नेमणूक देण्यात येणार असून साताऱ्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत. पानमळेवाडी येथे भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या इमारतीत प्रथम वर्षाचे वर्ग, प्रात्यक्षिक वर्ग, वसतिगृह, ग्रंथालयांचा विकास करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले.
मेडिकलचे प्रवेश ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये
सातारा मेडिकल कॉलेजच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरणासह आस्थापनावरील पदभरतीच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान कमिशनच्या तपासणी दौऱ्यानंतर नीट परीक्षा वेळेत झाल्यास यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रथम वर्ष वैद्यकीय प्रवेश शक्य असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या