बंदी आदेशाला हरताळ फासून आणि नाकावर टिच्चून सुरू ठेवला व्यवसाय
Satara News : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊन जाहीर करून सर्वत्र संचारबंदीचे आदेश लागू केले असताना महाबळेश्वर - पाचगणी रस्त्यावर मॅप्रो कंपनीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासून आणि नाकावर टिच्चून व्यवसाय जोमाने सुरूच ठेवला. एकीकडे छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर दंडात्मक तर कधी सील करण्याची कारवाई केली जाते. मात्र, मॅप्रो कंपनीवर प्रशासन एवढे मेहरबान का? असा सवाल नागरिक करीत आहेत.
कोरोनाच्या बाबतीत सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे नियम शिथील होण्यास थोडा वेळ लागत आहे. सध्या आठवड्यातील काही दिवस नियम शिथील करून शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, विकेंडला महाबळेश्वर व पाचगणी येथे पर्यटकांची चांगलीच वर्दळ वाढली आहे. शनिवारी महाबळेश्वर - पाचगणी रस्ता, भिलार, भौसे, नंदनवन कॉलनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक मुक्कामी आले होते. हे सर्व आज रविवारी चेकआउट करून बाहेर पडले.
कोरोना विसरून पर्यटकांची गर्दी
या पर्यटकांना महाबळेश्वर येथे कडक बंदमुळे काही खरेदी करता आली नाही. परंतु गुरेघर येथे मॅप्रो कंपनीने आपला व्यवसाय सुरू ठेवल्याने पर्यटकांची पावले मॅप्रो कंपनीकडे वळल्याचे पहायला मिळाले. सकाळपासूनच घराकडे निघालेल्या पर्यटकांनी खरेदीसाठी मॅप्रो कंपनीच्या गेटवर गर्दी केली होती. या ठिकाणी त्यांना रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांबरोबरच जाम, जेली, सिरप, चॉकलेट आदी सर्व मिळत होते. त्यामुळे पर्यटक कोरोना विसरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना पहायला मिळाले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पर्यटकांनी धाब्यावर बसवला.
जिल्ह्यात शनिवारी - रविवारी कडक लॉकडाऊन असल्याने सर्व आस्थापना बंद होत्या. रेस्टॉरंटमधील पार्सल सेवादेखील विकेंडमध्ये बंद ठेवण्याचे आदेश आहेत. महाबळेश्वर येथील सर्व व्यवसायिक या नियमांचे कोटकोरपणे पालन करीत आहेत. मॅप्रो कंपनी मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला हरताळ फासत असताना प्रशासन तिकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कारवाईकडे सर्वांचेच लक्ष
कोणी कितीही तक्रारी केल्या तरी आमच्या मालकाचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी शेखी तेथील कामगार मिरवत असतात. मॅप्रोकडून होत असलेल्या नियमभंगाबाबतची माहिती पत्रकारांनी प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांना दिली. आता प्रांताधिकारी मॅप्रो कंपनीवर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या