‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रवीण जाधवचे तोंड भरून कौतुक
Sports News : फलटण तालुक्यातील सरडे या छोट्याशा गावातील प्रवीण रमेश जाधव याची जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आर्चरी विभागात निवड झाली आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या या यशाने गाव तर आनंदले आहेच, पण सातारा जिल्हा व महाराष्ट्राची मानही यामुळे अभिमानाने उंचावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मध्ये विशेष दखल घेत त्याच्या यशाचे कौतुक केले आहे.
प्रवीणला अगदी लहानपणापासून आर्चरीची आवड होती. वयाच्या अवघ्या १२ किंवा १३ व्या वर्षी त्याच्यातील हा स्पार्क पहिल्यांदाच सर्वांसमोर आला. इयत्ता चौथीत असल्यापासून तो आर्चरी हा क्रीडाप्रकार शिकत होता. पुढे क्रीडा प्रबोधिनीमधून त्याने संभाजीनगर, नंतर पुणे, दिल्ली या ठिकाणी आर्चरीचे प्रशिक्षण घेतले. प्रवीण जाधवची घरची परिस्थिती खूपच बेताची असून आई शेतमजूर आणि वडीलदेखील सेंट्रिंगच्या कामावर रोज जातात. रोज काम केल्याशिवाय त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. अशी बिकट परिस्थिती असतानादेखील प्रवीण जाधवने कष्ट आणि जिद्द उराशी बाळगली. देशासाठी खेळण्याचे स्वप्न आणि जिंकण्याचे एकच ध्येय समोर ठेवून तो वाटचाल करत राहिला.
सर्वांसाठी ही अभिमानाची बाब - पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसारित झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात प्रवीणच्या भरारीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. टोकियोला जाणाऱ्या ऑलिम्पिक संघात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणा देणारे आहे. प्रवीण जाधव हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील आहे. तो उत्तम तिरंदाज आहे. त्याचे पालक कुटुंब चालविण्यासाठी मजुरी करतात. आता त्यांचा मुलगा टोकियोला ऑलिम्पिक खेळण्यासाठी जात आहे. केवळ त्याच्या पालकांनाच नव्हे तर आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. प्रवीणची ही गगनभरारी आणि त्याचा हा प्रवास फार प्रेरणादायी आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्याचे कौतुक केले आहे.
राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून आभार
दरम्यान, 'मन की बात'मध्ये प्रवीण जाधव या सातारा जिल्ह्यातील धनुर्विद्या क्रीडापटूचा गौरवपूर्ण उल्लेख केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान महोदयांचे या गौरवपूर्ण उल्लेखाबाबत मी आभार व्यक्त करतो तसेच संपूर्ण राज्याच्या वतीने प्रवीण जाधवला ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान यशासाठी शुभेच्छा देतो, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या