भ्रष्टाचार रोखण्यासाठी १०० रुपयांवरील चलन, रोखीचे व्यवहार बंद करा : हेमंत पाटील
Politics News : काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मोदी सरकारच्या कारभारावर गप्प का आहेत? असा खडा सवाल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या आठ महिन्यांपासून दिल्लीत सुरु असून, आजवर अण्णांनी त्याविरोधात एक शब्दही का काढला नाही? अशी सरबत्ती त्यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत हेमंत पाटील यांनी अनेक मुद्यांवर परखड मते मांडली. दिल्लीत शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांबाबत अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. 'शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन करु' असे अण्णा हजारे म्हणाले होते. पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटून गेले की अण्णा हजारे यांनी भूमिका बदलली. सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही असे वाटते, अशी टीका करून, भाजपच्या काळात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मैदानात उतरु, असे पाटील यांनी सांगितले.
भाववाढीवर अण्णा हजारेंचे मौन
मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आमचा लढा सुरु राहील. आज मोदी सरकार अनेक संस्थांचे खाजगीकरण करत आहे. अंबानी - अदानी यांना देश विकण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. देशात कोरोनासह महागाईचे संकट आलेले आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. तरीही याविरोधात अण्णा हजारे मौन धारण करून बसले आहेत. भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर १०० रुपयांवरील चलन बंद करायला हवे. तसेच रोखीने व्यवहार बंद व्हावेत आणि आधार लिंकशिवाय व्यवहार होऊ नयेत या तीन गोष्टींची अंमलबजावणी केली तर भ्रष्टाचार संपवायला मदत होईल, असे मतही हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.
पडळकरांनी आपली पात्रता ओळखून बोलावे
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली पात्रता ओळखून भाष्य करावे. तोंडाला येईल ते बोलून स्वत:चा पचका करून घेऊ नये. शरद पवार, अजित पवार यांच्यावर बोलताना त्यांची अनेकदा जीभ घसरली आहे. बेताल वक्तव्य करून, मोठ्या व्यक्तींवर टीका करून प्रसिद्धी मिळविण्याचा हा खोटा प्रकार त्यांनी करू नये. अशी बेताल वक्तव्य यापुढेही सुरूच राहिली, तर गाठ आमच्याशी आहे हे पडळकरांनी लक्षात ठेवावे, असेही त्यांनी पडळकरांना सुनावले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या