Satara News : निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण


निसर्गात देव शोधण्याचे कार्य सर्वश्रेष्ठ - जिल्हाधिकारी शेखर सिंह

Satara News : संतांनी निसर्गात देव शोधला. हेच काम निसर्ग वारीच्या माध्यमातून सुरू आहे. निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे काम सर्वश्रेष्ठ आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.

पुनर्वसित डिचोली (धोंडेवाडी, ता. कराड) येथे निसर्गवारी २०२१ अंतर्गत आयोजित वृक्ष लागवड उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निसर्ग वारी ग्रुपचे प्रमुख सतीश मोरे, सहप्रमुख रणजित पाटील. सदस्य व नगरसेवक विजय वाटेगावकर, गौतम करपे, संदीप सूर्यवंशी, अभिजीत सूर्यवंशी, डॉ. अमित खाडे तसेच जि. प. सदस्य मंगलताई गलांडे, सरपंच रेखा काकडे, उद्योजक बाळासाहेब कोळेकर, माणिक गंगवणे, अनिल पवार, संजय काकडे, शैलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

निसर्गवारी ग्रुपचे कार्य दिशादर्शक

जर्मनीमध्ये अतिवृष्टी होऊन पूर आला. त्यामध्ये १८० ते २०० लोकांचे मृत्यू झाले. अरबी समुद्रात कधी सायक्लॉन येत नव्हते. परंतु २००१ पासून ते येऊ लागले आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये तापमान ५० डिग्री सेल्सिअस होते. याला कुठे न कुठे माणूसच जबाबदार आहे. वृक्षतोड कारणीभूत आहे. या परिस्थितीत निसर्गवारी ग्रुपचे वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समाजाला दिशा देणारे ठरेल, अशा शब्दात जिल्हाधिकारी सिंह यांनी कौतुक केले.

पहिला पाऊस जून-जुलै, ऑगस्टमध्ये पडत होता. मात्र गेली १० ते १५ वर्षांपासून पाऊस अवेळी पडत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे झाडे लावण्यामध्ये मोठा वाटा शेतकरी बांधवांचा असला पाहिजे. आपण आषाढी वारीनिमित्त झाडे लावतो आहे. विठ्ठलाचे रुप म्हणून त्याचे संगोपन करा, असे आवाहन त्यांनी केले. 

आज वारी सार्थकी लागली

सतीश मोरे म्हणाले, २०१५ पासून आळंदी ते पंढरपूर वारी करत आहे. मात्र कोरोनामुळे वारी बंद आहे. मागील वर्षी मनमंदिर  वारी केली. यावर्षी वारी कशी करावी असा विचार सुरू होता. ऑक्सिजनची वाढलेली गरज आणि वाढणारे प्रदूषण ओळखून २२१ वडाची झाडे लावण्याचा संकल्प केला. आळंदी ते पंढरपूर अंतर २२१ कि.मी.असल्यामुळे एवढी झाडे लावली. प्रत्येक झाडात माउलीचे रूप आहे. डिचोलीत वृक्षारोपणाचा योग आला. येथे लावलेल्या झाडांचे संगोपन येथील ग्रामस्थ करतील याची खात्री आहे. आज वारी सार्थकी लागली आहे. 'याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा', याची प्रतिची आली.

यावेळी बाळासाहेब कोळेकर यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन काकडे यांनी केले. आभार सुरेश चौगुले यांनी मानले. यावेळी डिचोली येथे १०४ वृक्षारोपण ग्रामस्थ व निसर्गवारी परिवाराच्या वतीने करण्यात आले.

वडाची डिचोली ओळख व्हावी

पुनर्वसित डिचोलीमधील ग्रामस्थ वृक्षप्रेमी आहेत. येथील प्रत्येकाच्या घरासमोर लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडे याची जाणीव करून देत आहेत. वृक्षांबाबत त्यांचे प्रेम पाहूनच येथे जास्तीत जास्त झाडे लावण्याचा निर्णय निसर्गवारी ग्रुपने घेतला आहे. आज येथे १०४ झाडे लावण्यात आली आहेत. यातील ७५ झाडे वडाची आहेत. येथे मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. भविष्यात हे गाव केवळ डिचोली म्हणून नव्हे तर वडाची डिचोली म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद सतीश मोरे आणि रणजित पाटील यांनी व्यक्त केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या