Satara News : कराडला कोरोना संकटाच्या खाईत लोटले कोणी ?


लोकांचे जीव कवडीमोल नाहीत; संकट कशामुळे वाढले याची चौकशी होण्याची गरज

Satara News : सातारा जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कोरोना रूग्ण कराड तालुक्यात निघत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे सातारा तालुक्याच्या खालोखाल पण अन्य तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. मात्र, प्रशासन याबाबत चकार शब्द बोलत नाही. ‘मुलांचा होतो खेळ, पण बेडकाचा जातो जीव’ असे लोकांच्या बाबतीत होऊ नये. त्यांचे जीव कवडीमोल नाहीत. त्यामुळे कराड तालुक्याला या महाभयानक संकटात लोटण्यास जबाबदार कोण याची चौकशी होणे गरजेचे आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कराड तालुक्याची मोठ्या प्रमाणात होरपळ झाली होती. कराडच्या डोंगरी भागातील लोक प्रामुख्याने मुंबईत आहेत. तसेच शहरी भागातील लोक पुण्यात आहेत. त्या पुण्या - मुंबईच्या लोकांचे लोंढे गावाकडे आल्याचा तो परिणाम होता असे सांगितले जात होते. दुसऱ्या लाटेच्या काळात हे स्थलांतर नाममात्र होते. तरीही सातारा तालुक्याच्या खालोखाल कराड तालुका हॉटस्पॉट झाला आहे. 

कराड, सातारची स्थिती गंभीर

शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ९५ हजार ९४ इतके लोक बाधित निघाले आहेत. त्यामध्ये सातारा तालुक्याचा वाटा ४० हजार ८१४ इतका, तर कराड तालुक्याचा वाटा २८ हजार २८९ इतका आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आजवर कोरोनाने ४४३४ जणांचा बळी घेतला असून त्यामध्ये सातारा तालुक्यातील १२४७, तर कराड तालुक्यातील ८३३ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. याचाच अर्थ अन्य तालुक्यांशी तुलना करता या दोन तालुक्यांमध्ये कोरोनाने दाणादाण उडवल्याचे स्पष्ट होते. सातारा तालुक्यापुरते सांगायचे, तर सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागातील तसेच अन्य जिल्ह्यातीलही काही रूग्णांची नोंद सातारला झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा तालुक्याची स्थिती फारच विदारक दिसत आहे.

निवडणुकीमुळे जनसामान्य धास्तावले

पण कराडला इतके विदारक चित्र का आहे याचे स्पष्टीकरण ना प्रशासन करत आहे, ना आरोग्य विभाग. अलीकडे कराड तालुक्याचे बाधितांचे व मृतांचे दररोजचे आकडे पाहिले, तर ‘आकडी’ आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाचे गंभीर संकट आ वासून उभे असताना तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा घाट घातला गेला. मग या उत्सवात मागे कोण राहणार ? सभा, मेळावे आणि निवडणुकीसाठी जे जे चालते, ते सर्व झाले. या निवडणुकीशी संबंध नसलेला समाजातील घटक मात्र हे पाहून धास्तावला होता. त्याबद्दल नापसंतीही व्यक्त करत होता. कराड तालुक्यातील कोरोनाचे थैमान वाढत चाललेले पाहून त्याला ही निवडणूक कारणीभुत असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे. म्हणूनच प्रशासनाने याबाबतीत स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. कोरोनाच्या कराड तालुक्यातील या तांडवाला जबाबदार कोण हे जनतेपुढे येणे गरजेचे आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या