कोयना धरणात १५ टीएमसी पाणी वाढले; जिल्ह्यात महापुराचे संकट
Satara News : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कालपासून आभाळ फाटल्याप्रमाणे मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मिलीमीटरमध्ये नव्हे, फुटात पाऊस मोजावा असा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे कृष्णा - कोयनेसह नद्यानाल्यांना उधाण आले असून नद्यांकाठच्या गावांचा भीतीने थरकाप उडाला आहे. कोयना धरणात तर चोवीस तासात उच्चांकी १५ टीएमसीने वाढ झाली आहे. वाई, सातारा, कराड, पाटण, जावलीसह जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने कृष्णामाईने रूद्रावतार धारण केला आहे.
जिल्ह्यात मध्यंतरी जवळपास तीन आठवडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीप हंगाम अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. कोयना धरणातील पाणीसाठाही वाढत नव्हता. त्यामुळे चिंता होती. पण कालपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीत तर आभाळ फाटल्याप्रमाणे तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून धरणांमधील पाणीसाठा 'विद्युत'वेगाने वर आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाँधार पावसाने व प्रमुख धरणांमधून पाणी सोडायला सुरूवात झाल्याने महापुराचे संकट ओढवले आहे.
छत्रपती शाहूंची समाधी पाण्यात
धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा नदीने रूद्रावतार धारण केला आहे. त्यामुळे नदीकाठची गावे हादरली आहेत. वाईला गणपती घाट पाण्याखाली गेला असून पाणी वाढत आहे. सातारा तालुक्यातील लिंब येथील कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या पाषाणावर असलेले प्रसिध्द कोटेश्वर मंदिर महापुराने वेढले आहे. सातारा येथे संगममाहुली येथे कृष्णा - वेण्णा संगमावरील छत्रपती शाहू महाराजांची समाधी पाण्यात बुडू लागली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या