Satara News : ‘जरंडेश्वर’ला केलेला कर्ज पुरवठा सुरक्षित - शिवेंद्रराजे


कर्जापेक्षा तारण रक्कम जास्त; खास बाब म्हणून कोणालाही कर्ज दिले नाही

Satara News : जरंडेश्वर शुगर मिल्स या साखर कारखान्याला देण्यात आलेल्या कर्जापेक्षा तारण रक्कम जास्त असल्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून जरंडेश्वरला केलेला कर्ज पुरवठा सुरक्षित असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या मुख्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सहभाग योजनेंतर्गत सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर शुगर मिल्सला कर्ज पुरवठा केला आहे. रिझव्र्ह बँक व नाबार्डच्या नियमांनुसारच जरंडेश्वर कारखान्याला कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. जरंडेश्वरसह सर्वच कारखान्यांना दिलेले कर्ज हे नियमानुसारच आहे. खास बाब म्हणून कोणत्याही कारखान्याला कर्ज दिलेले नाही. कारखान्याला कर्ज पुरवठा करण्यासाठी ४७२ कोटींची मालमत्ता व १०० कोटींची साखर असे तारण म्हणून घेण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हप्ते नियमितपणे सुरू आहेत 

पुणे जिल्हा बँकेची सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा संपल्याने सहभाग योजनेंतर्गत जरंडेश्वरला कर्ज देण्यात आले आहे. तसा प्रस्ताव कारखान्याने बँकेकडे सादर केला होता. कारखान्याची मालमत्ता, उत्पन्नाचे स्त्रोत या बाबींचा विचार करूनच हे कर्ज देण्यात आले आहे. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर २३७ कोटी ६० लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. यासाठी ४७२ कोटी ८५ लाख असलेली मालमत्ता व १०० कोटींची साखर मालतारण म्हणून घेतली आहे. यापैकी कारखान्याने १२८ कोटी ४५ लाखांचे कर्ज घेतले आहे. त्यातील ३१ कोटी रूपये बँकेने भरले असून ९७ कोटी ३९ लाख रूपये थकबाकी राहिली आहे. तर मालतारण असलेल्या साखरेवर ३० कोटींचे कर्ज उचलले असून त्यातील १५ कोटीची रक्कम व्याजासह फेडली आहे. कारखान्याचे नियमित हप्ते सुरू असून बँकेचा फायनान्स हा सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

चुकीच्या पध्दतीने कर्ज पुरवठा नाही

सातारा जिल्हा बँकेने जिल्ह्यातील पाच सहकारी व दोन खासगी कारखान्यांना पुरवठा केला आहे. सर्व कारखान्यांना नियमानुसारच कर्ज दिले असून खास बाब म्हणून कोणालाही कर्ज दिलेले नाही. कुठल्याही चुकीच्या पध्दतीने कर्ज पुरवठा करण्यात आलेला नाही. कर्ज पुरवठ्याबाबत कोणतेही उल्लंघन झालेले नाही. आरबीआय व नाबार्डच्या ऑडीटमध्ये या गोष्टी तपासण्यात आल्या आहेत. बँकेंच्या कर्जाच्या धोरणाप्रमाणेच हा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. एका कारखान्याला वेगळे व दुसऱ्या कारखान्याला वेगळे हे धोरण राबवले गेलेले नाही, असेही शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या