शरद पवार यांचे निष्ठावंत पाईक काळाच्या पडद्याआड, जिल्हावासीयांना धक्का
Satara News : 'पुस्तकांचे गाव' भिलारचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे (वय ७२) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने भिलार (ता. महाबळेश्वर) येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
बाळासाहेब भिलारे तथा दादा यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. त्यातच आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर साडेबारा वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भिलार, पाचगणीसह महाबळेश्वर तालुक्यावर दु:खाची छाया पसरली. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांच्या अचानकपणे जाण्याच्या वृत्ताने धक्का बसला.
सर्वांना आपला वाटणारा नेता
बाळासाहेब भिलारे हे सलग २५ वर्ष भिलार गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते जिल्ह्यात पक्षवाढीसाठी खबीरपणे कार्यरत राहिले. महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणावर त्यांची मजबुत पकड होती. सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्व समाजघटकांना आपला वाटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यामुळेच त्यांनी ज्योती जाधवसारख्या तळागाळातील कार्यकर्तीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसवले.
सन २००४ ते ०८ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषवले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते दहा वर्षे संचालक होते. नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्य, स्ट्रॉबेरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. पाचगणीत त्यांनी हिलरेंज स्कूल स्थापन केले होते. आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिवजयंतीनिमित्त प्रतापगडावर जिल्हा परिषदेची सभा आयोजित करण्याचा चांगला पायंडा पाडला. त्यांचे वडील एम. आर. तथा मारूती भिलारे हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. त्यांचा राजकीय वारसा दादांनी पुढे चालवला.
पर्यटनवाढीसाठी तळमळीने काम !
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे. महाबळेश्वर-पाचगणीच्या विकासासह पर्यटनवाढीसाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला असून राजकीय, सामाजिक चळवळीची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या