महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदवीर रवींद्र पिंपळेंची करूण कहाणी
Satara News : कोरोनाच्या आपत्तीने भल्याभल्यांना मेटाकुटीला आणले आहे. कोरोनामुळे नोकरदार, छोटे - मोठे व्यावसायिक, उद्योजक तसेच सामान्य नागरिकांचे अर्थकारण कोलमडले आहे. कलेच्या प्रांतात आपला ठसा उमटवणाऱ्यांची तर ससेहोलपटच झाली आहे. महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील नांदवळच्या एका लोककलावंतावर पोटाची खळगी भरण्यासाठी रस्तोरस्ती फिरून भंगार गोळा करण्याची वेळ आली आहे. मायबाप सरकार किंवा कलेवर प्रेम करणाऱ्या रसिकांकडून मदत मिळाली तर या कलावंताची उपेक्षा थांबू शकेल.
कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीने अनेकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. अशा स्थितीमुळे लोककलावंतांना पुन्हा उभारी घेणे फारच अवघड झाले आहे. ग्रामीण मराठी माणूस आणि तमाशा यांचे नाते अतूट आहे. तमाशा हा लोकांचे मनोरंजन करणारा अत्यंत आवडीचा प्रकार. परंतु कोरोनामुळे मागील जवळपास दोन वर्षात तमाशा ठप्प झाला असून त्यावर अवलंबून असलेल्या कलाकारांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे मूळ गाव असलेल्या नांदवळ येथील तमाशा कलावंत रवींद्र पिंपळे हे या संकटाचे चटके सध्या सोसत आहेत.
दोन वेळच्या अन्नाची चिंता
ज्या रवींद्र पिंपळे या विनोदी कलाकाराने गेली अनेक वर्षे महाराष्ट्राला खळखळून हसविले, तोच कलावंत आज गरीबीने ग्रासला असून त्याला आता दोन वेळच्या अन्नाची चिंता सतावत आहे. महाराष्ट्रातील असे कोणतेही गाव नाही की तिथे या विनोदाच्या बादशहाला लोक ओळखत नाहीत. मात्र विनोदाचा बादशहा म्हणून ओळख असणारा हा विनोदवीर आज चक्क कोणाच्या बांधकामावर बिगारी म्हणून, तर कधी भंगार गोळा करण्यासाठी फिरत आहे. त्यांच्यासारख्या गुणी कलावंतावर ही वेळ येत असेल, तर इतर लहान कलाकारांनी कोणाकडे आशेने पहायचे व काय खायचे असा उद्विग्न सवाल जनता करत आहे.
मायबाप सरकारने किंवा कलारसिक, संवेदनशील जनतेनेही या कलावंताला मदत करून सावरण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. ज्यांना कुणाला या कलावंताला मदत करायची असेल, त्यांनी गुंफण अकादमीच्या ‘गुंफण, कराड अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक, खाते क्रमांक - 1004005004354 / आयएफएससी कोड - KUCB0488004 या खाते क्रमांकावर पाठवावी, ही मदत त्यांना पोहोचवण्यात येईल, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या