शांततेची ‘बोलणी’ झाल्यानंतर दुसऱ्या अंकात राडा; सहाजण गंभीर जखमी
Satara News : खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंदराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा राडा झाल्याने सातारकर चक्रावून गेले आहेत. काल रात्री संपर्क कार्यालयासमोर गाडी लावल्याच्या कारणावरून उडालेल्या या धुमश्चक्रीत सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आयोजित बैठक झाल्यानंतर काही तासातच ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे, की गणेशोत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी काल पोलीस करमणूक केंद्रात गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी यादृष्टीने सर्वांना सूचना केल्या. त्यानंतर काही तासातच हा राडा झाल्याने 'पालथ्या घड्यावर पाणी' म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली.
१६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
सातारा येथील दुर्गा पेठेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयासमोर खासदार उदयनराजे यांचे कट्टर समर्थक सनी भोसले यांनी गाडी लावल्याच्या कारणावरून खंदारे समर्थकांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने आपल्या गँगला बोलावून घेतले. ही कुमक आल्यावर एकच हलकल्लोळ उडाला. या तुफान राड्यात सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. गणेशोत्सवाचे नगारे वाजायला सुरूवात होताच हा राडा होऊन शहरातील सार्वजनिक शांतता धोक्यात आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सातारची दखलपात्र घटना
साताऱ्यात दोन्ही राजांच्या समर्थकात राडा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कथित मनोमीलन फाटल्यापासून या घटना घडत आहेत. त्याची किंमत गुन्ह्यांच्या रूपाने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना मोजावी लागली आहे. तरीही आता हा राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ही घटना दखलपात्र ठरली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या