कोरोनाची दहशत झुगारून खरेदीसाठी रस्त्यावर; प्रमुख बाजारपेठा गजबजल्या
Satara News : सलग दुसऱ्या गणेशोत्सवातही असलेल्या कोरोना संकटाच्या सावटात सातारा जिल्हावासीयांनी विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागताची उत्साहाने तयारी केली आहे. कोरोनाची दहशत दोन वर्षे अनुभवत असुनही सजावटीच्या साहित्य, प्रसाद आदिंच्या खरेदीसाठी प्रमुख बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. 'तूज सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, या संकटाचे निवारण कर' अशी मनोमन प्रार्थना करत लोक गणरायाच्या आगमनासाठी आतुर झालेले पहायला मिळत आहेत.
गेले काही दिवस बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या भाविकांचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून गणरायाच्या आगमनाचा क्षण आता समीप आला आहे. बहुतेकांनी आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्ती निश्चित केल्या असून घरोघरी त्याच्या आसनव्यवस्थेची, सजावटीची, विद्युत रोषणाईची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. घरोघरी जास्वंदीची फुले, दुर्वा याची जुळणी करण्यात लोक व्यस्त असलेले पहायला मिळाले. काही ठिकाणी मंडळांसाठीच्या मोठ्या गणेशमूर्तींवर अंतिम हात फिरवण्यात मूर्तीकार गुंतलेले दिसले. मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उद्याची लगबग दिसत होती.
पोलिसांकडून तपासणीची मोहीम
गणरायासाठी खव्याचे मोदक, दागिने, पूजा साहित्य तसेच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रमुख बाजारपेठा गजबजल्या आहेत. विशेषत: सातारा शहरात मोती चौक, सदाशिव पेठ, खालचा रस्ता, वरचा रस्ता, पोवई नाका परिसरातील गर्दी विचारात घेऊन शहर वाहतूक विभागाने आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. तीन दिवसात जवळपास पाचशेवर नागरिकांची ही तपासणी करण्यात आली आहे. सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशांनाही एक दिवस आधीच घरी नेण्यास सातारकरांनी पसंती दिली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या