कुणाचा गुलाल आणि कुणाचा ‘कार्यक्रम’ हे सकाळी १० पर्यंत होणार स्पष्ट
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता सुरू होत असून सर्वांनाच प्रचंड औत्सुक्य असलेल्या सोसायटी मतदारसंघांचे निकाल दहा वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. संपूर्ण मतमोजणी दुपारी १२ पर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहणार असली तरी कुणाच्या नशिबी गुलाल येणार आणि कुणाचा ‘कार्यक्रम’ होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ११ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १० जागांसाठी २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कराड सोसायटी मतदारसंघ हा आजपर्यंत विलासकाका पाटील - उंडाळकर यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर हे येथून नशीब अजमावत आहेत. तथापि, राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे सत्तारूढ सहकार पॅनेलच्या वतीने या मतदारसंघातून रणांगणात उतरल्याने ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. मात्र आमदार शशिकांत शिंदे विरूध्द (अजूनतरी कुंकू राष्ट्रवादीचेच असलेले) ज्ञानदेव रांजणे यांच्यातील जबरदस्त संघर्षामुळे जावली सोसायटी मतदारसंघातील लढत सर्वाधिक चर्चेची बनली आहे.
कराड व जावलीबाबत प्रचंड उत्सुकता
कराड व जावलीच्या निकालाबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे पाटण, खटाव, माण सोसायटी मतदारसंघांच्या निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई विरूध्द सत्यजीत पाटणकर, खटावमध्ये नंदकुमार मोरे विरूध्द प्रभाकर घार्गे, माणमध्ये मनोजकुमार पोळ विरूध्द शेखर गोरे यांच्यातील सामना रंगतदार ठरला आहे.
दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती
मंगळवारी सकाळी आठ वाजता सातारा येथील जरंडेश्वर नाका येथील नागरी बँक्स असोसिएशनच्या सभागृहात मतमोजणीस सुरूवात होणार आहे. यासाठी ११ तालुक्यांसाठी ११ टेबलची व्यवस्था आहे. त्यावर सुरूवातीला त्या त्या तालुक्यातील मतपेट्या उघडल्या जातील. एकूण झालेल्या मतांचा हिशेब केला जाईल. त्यानंतर गटनिहाय मतमोजणी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात विकास सेवा सोसायटी मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण होईल. दहा वाजेपर्यंत हा 'हाय व्होल्टेज' निकाल अपेक्षित आहे. त्यानंतर पतसंस्था व बँका मतदारसंघ, त्यानंतर राखीव (ओबीसी व महिला) मतदारसंघांची मतमोजणी होईल. दुपारी १२ पर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी दिली.
Satara DCC Bank Election
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या