Satara News : माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे जबाबदार


चर्चेत गुंतवून ठेवत मतदार पळवापळवीचे षडयंत्र रचले - आमदार शशिकांत शिंदे

Satara News : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो हे मान्य आहे. पण एकीकडे चर्चेत गुंतवून ठेवत दुसरीकडे मतदार पळवापळवीचे षडयंत्र रचण्यात आले, असे सांगत, माझ्या पराभवाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच जवाबदार आहेत. त्यांच्यामुळे माझा पराभव झाला, असा थेट आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

सातारा जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका रोखठोकपणे जाहीर केली.

पक्षाशी एकनिष्ठ असताना विश्वासघात

शिवेंद्रसिंहराजे यांच्याविषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी. मी सरळपणाने निवडणूक लढवली, कोणतीही दादागिरी केली नाही, असे त्यांनी सांगितले. सातारा - जावली मतदारसंघातून विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे नऊ आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र जे विरोध करतात ते बिनविरोध होतात, लगेचच विरोधातले अर्ज माघारी घेतले जातात आणि जे पक्षाशी एकनिष्ठ आहेत त्यांना मात्र चर्चेत खेळवत ठेवून त्यांचा विश्वासघात केला जातो हे अनाकलनीय आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा.

पक्षातील नेत्यांचे षडयंत्र

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये, याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले, पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकद असूनही पराभूत होतो यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

गोवा, तिरूपती, म्हैसूर, उटी, विशाखापट्टणम येथे मतदारांपर्यंत पोहचलो होतो. मतदारांना ताब्यातही घेतले असते तर आज निकाल वेगळा असता. मग यांनीच आम्ही गुंडगिरी केल्याचा आरोप केला असता. मात्र पक्ष चौकटीबाहेर मी काम करणार नाही. 

राष्ट्रवादीची ताकद उभी करणार

आमचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांच्या आदेशाप्रमाणे पक्षवाढीसाठी अखंड सक्रिय राहून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नऊ आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षादेश झाल्यावर राष्ट्रवादीची मोठी ताकद उभी करणार असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.

शिंदे पुढे म्हणाले, मतदानाच्या आदल्या दिवशी बैठक होऊन माझ्यासाठी मदत करावयाचे ठरले. मात्र प्रत्यक्षात वेगळेच काही शिजत होते. तिथेच माझी फसगत झाली. आधीच नाही म्हणाले असते तर मी समजू शकलो असतो. माझ्या पराभवानंतर बेफामपणे नृत्य करणारे शिवेंद्रराजे होते, तर या कटकारस्थानाचे प्रमुख कोण हे सर्वांना समजले आहे. मी काही ठिकाणी गाफील राहिलो हे मान्य. मात्र मी सरळ मनाचा राजकारणी असून तोंडावर एक आणि मनात एक माझी भूमिका नाही. मतदान केंद्रावर मी हसत खेळत निवडणूक पार पाडली. पण माझ्यावर गुंडगिरीचा आरोप करणाऱ्यांनी तुमचा ऊस नेणार नाही अशा धमक्या गावात दिल्या. कोणाला नोकरीच्या भूलथापा दिल्या. मात्र शशिकांत शिंदे यांनी सतत पक्षीय चौकट मानून काम केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या