Satara Story : बबन पोतदार : संवेदनशील कथाकार


कसदार साहित्य निर्मितीतून वाचकांचे अनुभवविश्र्व समृद्ध करणारे लेखक

मसूर गावचे सुपुत्र, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि आपल्या सर्वांच्या दिवसाची सुरुवात ज्यांच्या सुविचाराने होते ते सर्जनशील लेखक, आपल्या सर्वांचे दादा मा. बबन पोतदार यांचा आज ७५ वा वाढदिवस. त्यानिमित्त...

 - गजानन चेणगे

मसूरच्या शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत असताना बबन पोतदार तथा दादा यांचं नाव नेहमी निघायचं. आपल्या गावचे लेखक म्हणून मसूरकरांना त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि आदर वाटे. आम्हाला मराठीला डी. एल. जगताप सर शिकवायला होते. सर्वजण त्यांना जगताप नाना म्हणत. तेच पूर्वी दादांचेही शिक्षक होते. तेही दादांचे नाव कौतुकाने घेत. दादांचा पहिला कथासंग्रह 'गुंजेचा पाला' हा तर आम्हाला खूप आवडे. कारण त्यात ज्या व्यक्तिरेखा दादांनी लिहिल्या आहेत ती माणसे आमच्या अवतीभवतीची आहेत. अटकल, बगाराम मास्तर, पकूमावशी अशा विविध कथांमधून मसूर आणि परिसरातील ठिकाणांची नाव यायची. त्यामुळे या कथांच्या बाबतीत आणखी आपुलकी वाटायची. कथांच्या व्यतिरिक्त आकाशवाणीवरून दादांच्या आरसा, माजघरातल्या गप्पा या श्रुतिकाही ऐकायला मिळायच्या. एकूणच हे लेखक आपल्या गावचे आहेत याबद्दलचा अभिमान द्विगुणित व्हायचा.

आयकर अधिकारी म्हणून दादा पुण्यामध्ये शासकीय सेवेत होते. त्यांचे वास्तव्यही पुण्यातच आहे. पण आपल्या गावाविषयीची ओढ त्यांच्या मनात नेहमीच पाहायला मिळाली आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते वेळोवेळी मसूरला येत असत. आजही त्यांचा हा राबता सुरूच असतो. पण पूर्वी ज्यावेळी ते येत तेव्हा त्यांना पहायला आम्ही जात असू. 

गुंफण परिवारावर आभाळमाया

आपण कुणीतरी महान लेखक आहोत याबद्दलचा अहंकार दादांच्या स्वभावात कधीच पाहायला मिळाला नाही. त्यांनी अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने प्रत्येकाशी नाते जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याशी ज्यांचा ज्यांचा संबंध आला ते कायमस्वरूपी त्यांचे होऊन गेले. आमच्या चेणगे परिवाराशी कित्येक वर्षांपासूनचा त्यांचा ऋणानुबंध आहे. गुंफण दिवाळी अंक आणि गुंफण परिवाराच्या वाटचालीत दादांचे स्थान मोलाचे आहे. गेली अनेक वर्षे गुंफण दिवाळी अंकात त्यांच्या अनेक कथा वाचकांना वाचायला मिळाल्या आहेत. गुंफण साहित्य संमेलने यशस्वी होण्यासाठी आमच्यासोबत ते हिरीरीने सहभागी होत असतात. त्यांचा उत्साह पाहून मग आम्हा सर्वांचाच हुरुप वाढतो.

आमच्या आई दादांच्या विषयी त्यांच्या मनात नेहमीच जिव्हाळ्याची भावना आम्ही पाहिली आहे. त्याचबरोबर माझा भाऊ बसवेश्वर, बहिण स्वाती यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचे काम दादा करत असतात. लेखनाबद्दल कौतुकही करत असतात. आज-काल इतरांविषयी तारीफ करण्याकरिता सरकारने मजबूत टॅक्स लावल्यासारखे लोकांचे वर्तन असते. पण दादा मात्र याला अपवाद आहेत. चांगल्या गोष्टीचे तोंड भरून कौतुक करावे आणि काय चुकले असेल तर अधिकाराने सांगावे हे दादांच्या कडूनच शिकायला हवे. तो अनुभव आम्ही घेत असतो.

अनेक आवृत्त्या निघण्याचे भाग्य

'गुंजेचा पाला' कथासंग्रहानंतर दादांचे 'आक्रीत', 'एका सत्याचा प्रवास' असे आणखी कथासंग्रह प्रकाशित झाले. त्याच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या निघाल्या हे विशेष नोंद घेण्यासारखे आहे. कारण अनेक लेखकांच्या वाट्याला पुस्तकांच्या आवृत्त्या निघणे येत नाही. ते भाग्य दादांना लाभले किंबहुना यातून साहित्यविश्वात मसूरचा लौकिक वाढला याचा विशेष आनंद आम्हा मसूरकरांना आहे.  याव्यतिरिक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दादांची ट्रॅप ही मालिकाही खूप गाजली. त्यांच्या काही कथांवर आता चित्रपट निघणार आहेत. त्याचे पटकथा लेखन, संवाद लेखन सुरू आहे.

'शांतेय' गौरव ग्रंथ प्रकाशित

आदरणीय दादांची एकसष्ठी त्यांचे चिरंजीव पुष्कराज याने मोठ्या उत्साहात साजरी केली होती. साहित्यक्षेत्रातील अनेक दिग्गज त्याप्रसंगी उपस्थित होते. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा मागोवा घेणारा 'शांतेय' हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. या गौरव ग्रंथात आलेल्या लेखांमधून दादांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंवर प्रकाशझोत पडला आहे.

श्रोत्यांकडून भरभरून दाद

दादा जसे लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत तसेच उत्तम वक्ते म्हणून त्यांचा सर्वांना परिचय आहे. पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर सगळीकडेच त्यांची व्याख्याने होत असतात. त्यांच्या भाषणांना श्रोत्यांकडून भरभरून दाद मिळत असते. श्रोत्यांची मिळणारी ही दाद त्यांना सतत आनंदी, उत्साही आणि चिरतरुण ठेवण्याचे काम करते. हे त्यांच्यासाठी एक प्रकारचे इंधनच आहे म्हणा हवं तर. 

दादांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. यापुढेही त्यांच्या हातून साहित्य क्षेत्राची सेवा घडत राहो, साहित्य चळवळीसाठी त्यांचे योगदान मिळत राहो, नवोदितांना त्यांचे सदैव मार्गदर्शन मिळत राहो आणि या सर्वांसाठी त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो याच यानिमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा.

Author Baban Potdar

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या