प्रा. श्रीपाल जर्दे यांच्या क्रीडा कार्याचा सुवर्णमहोत्सव; आठ पुस्तकांचे प्रकाशन
Sports News : राजर्षि शाहू महाराजांनी लोककल्याणाच्या विविध कामांबरोबरच कुस्तीच्या क्षेत्रात कोल्हापूरचा लौकिक देशभर वाढवला. क्रीडाक्षेत्रातील हा कोल्हापूरचा दबदबा कायम ठेवा. हा इतिहास जतन करण्याचे आणि तो वृध्दिंगत करण्याचे काम करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले. प्रा. श्रीपाल जर्दे यांच्या क्रीडा क्षेत्रातील आतापर्यंतच्या मौलिक योगदानाचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने त्यांचा डी.लिट. पदवीने सन्मान करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीपाल जर्दे यांच्या क्रीडा कार्याचा सुवर्णमहोत्सव व त्यांच्या आठ ग्रंथांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. जैन बोर्डिेंग येथे क्रीडा भारतीतर्फे आयोजित या समारंभास अखिल भारतीय क्रीडा भारती पश्चिम विभागाचे अध्यक्ष विजय पुरंदरे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, सयाजी पाटील, धनाजी पाटील, संजय सबनीस, सुनीता जर्दे, शकुंतला खटावकर, अश्विनी पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ फुटबॉलपटू व पंच अरूण नरके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
उत्तम आरोग्यासाठी योग आवश्यक
विजय पुरंदरे यांनी प्रा. जर्दे यांच्या 'सूर्यनमस्कार' पुस्तकाबाबत विवेचन केले. मुलांनी एक तास मैदानी खेळ तसेच सूर्यनमस्कार घालणे आवश्यक असून पालक - शिक्षकांनी याबाबत जागरूक राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आपले आरोग्य आपणच सांभाळणे गरजेचे असून त्यासाठी योग आवश्यक आहे, असे सांगून चंद्रशेखर साखरे यांनी, क्रीडा क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. श्रीपाल जर्दे हे क्रीडा क्षेत्रातील परीस असल्याचे उद्गार त्यांनी काढले. अरूण नरके यांनी अध्यक्षीय भाषणात प्रा. जर्दे यांच्या आजवरच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा मागोवा घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. जर्दे यांनी मनोगतात क्रीडा क्षेत्रात आतापर्यंत केलेले काम, आलेले अनुभव याबाबत माहिती दिली.
वीरमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान
प्रारंभी प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जर्दे यांनी आजवर शारीरिक शिक्षण, क्रीडा, योग यावर २१ पुस्तकांचे लेखन करून क्रीडा साहित्यात मोलाची भर घातली आहे. यापैकी दोन ग्रंथांना शिवाजी विद्यापीठाचे पुरस्कार लाभले असून दोन ग्रंथांचा मराठी विश्वकोशाच्या १७ व्या खंडात संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश झाला आहे, असे सांगून त्यांनी, शिवाजी विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाने त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करावी, अशी मागणी केली. याप्रसंगी क्रीडापटू राही सरनोबत, उमा भोसले, सोनबा गोंगाणे व आफ्रिद आतार यांच्या मातोश्रींना वीरमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच अनुवादक, संशोधक, नवोदित खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या