खिंडवाडीत खडाजंगी: समर्थकांकडून तोडफोड करत राडा, कंटेनरही उलथवला
Satara News : सातारा बाजार समितीच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भूमिपूजनाचे नियोजन केलेल्या जागेच्या मालकी हक्कावरून आज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले आमने सामने भिडले. यावेळी त्यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सातारा शहरालगत खिंडवाडी हद्दीत असलेल्या या वादग्रस्त जागेवर खासदार उदयनराजे यांच्या समोरच आमदार शिवेंद्रराजे यांनी इमारतीचे भूमिपूजन केले, तर त्यामुळे संतप्त झालेल्या उदयनराजे समर्थकांनी तेथील साहित्याची तोडफोड करत त्या जागेत आणण्यात आलेला कंटेनर उलथवून टाकला. यावेळी दोघांच्या समर्थकांमध्ये जोरदार घोषणायुध्द झाल्याने तणावात आणखी भर पडली.
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत खिंडवाडी हद्दीत असलेल्या जागेवर आज सकाळी दहाच्या सुमारास सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम शिवेंद्रराजे यांनी आयोजित केला होता. पण त्याच्या आधीच खासदार उदयनराजे आपल्या शेकडो समर्थकांसह त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. दोन्ही राजे आमने सामने आल्याने दोन्ही बाजुच्या समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यातून हा तणाव वाढत गेला व वातावरण तापले. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वादग्रस्त जागी दोघांनीही केले भूमिपूजन
यावेळी खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे या दोघांनीही वादग्रस्त जागेवर दावा केला. कायदेशीरदृष्ट्या जागा बाजार समितीच्याच मालकीची असल्याने नवीन इमारतीसाठी भूमिपूजन करणारच अशी ठाम भूमिका शिवेंद्रराजे यांनी घेतली, तर आपल्या जागेत आपण कोणाला पाय ठेवू देणार नाही असे उदयनराजे यांनी खडसावले. आपण मोगलाई चालू देणार नाही. या जागेवर आपण संभाजीनगरसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणार आहोत. या ठिकाणी भूमिपूजन होऊ दिले तर तो कंटेम्ट ऑफ कोर्ट होईल असे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले. बराच वेळ ही खडाजंगी सुरु होती. त्या गोंधळातच शिवेंद्रराजे यांनी भूमिपूजन उरकले व त्या जागी कुदळही मारली. हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पहात बसणे उदयनराजे समर्थकांना कठीण झाले. त्यांनी तेथील साहित्याची तोडफोड करून कार्यक्रम उधळून लावलाच, शिवाय त्या ठिकाणी आणण्यात आलेला कंटेनरही त्यांनी उलथवून टाकला. यादरम्यान उदयनराजे यांनीही जलशुध्दीकरण प्रकल्प व अन्य विकासकामांचे भूमिपूजन त्या जागेवर करून टाकले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी 'एक नेता एक आवाज... उदयन महाराज उदयन महाराज' अशी जोरदार घोषणाबाजी केली.
घाबरत नसल्याचे दाखवून दिले!
तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दोन्ही बाजूना शांत करण्याचा केला. तसेच दोन्ही राजांना कार्यकर्त्यांसह तेथून जायला सांगितले. सध्या परिसरात वातावरण तणावपूर्ण पण शांत आहे. संबंधित जागेवर दोन्ही बाजुनी मालकी हक्क सांगितला जात असल्यामुळे त्यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. आज उपमुख्यमंत्री कराडला मुक्कामी असतानाच भाजपच्या नेत्यांमध्येच जुंपली असल्याने ते यावर काय तोडगा काढतात याकडे सातारकरांचे लक्ष आहे. दरम्यान, उदयनराजे यांच्या समोर नारळ फोडून आम्ही भूमिपूजन केलेले आहे. त्यांच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही हे आम्ही दाखवून दिले आहे. ही जागा बाजार समितीचीच असल्याने त्या ठिकाणी राडा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा सज्जड दम शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
ReplyForward |


0 टिप्पण्या