लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे आवाहन
Krantiveer Group News : राजमाता जिजाऊ साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर तसेच साने गुरुजींच्या आईप्रमाणे क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांनी डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्यासारखे क्रांतिवीर निर्माण केले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे बळ त्यांनी अण्णांना दिले. त्यांचा हा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी जपून भविष्यातील पिढी घडवावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
वाळवा येथे क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्या ३४ व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
वाळव्याची भूमी क्रांतिपीठ झाली
या मातीतून देशाला दिशा देणारी माणसे घडली. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वाने देवराष्ट्रे हे गाव चैतन्यपीठ, डॉ. पतंगराव कदम यांनी सोनसळ हे गाव शैक्षणिक पीठ, वसंतदादा पाटील यांनी पद्माळे हे गाव लोकगीत बनवले. तद्वतच वाळव्याची भूमी क्रांतिपीठ झाली आहे. या सर्व लोकांनी त्या त्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करून इतिहास घडवला. त्यांनी स्वतःचा प्रपंच न करता समाजाचा प्रपंच केला. या पाठीमागे त्यांना घडवणारी क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांच्यासारख्या मातांच्या संस्कारांचे योगदान खूप मोठे आहे असे उद्गार त्यांनी काढले.
आईच्या चरित्रातून धैर्याची शिकवण
अध्यक्षस्थानावरून बोलताना वैभवकाका नायकवडी म्हणाले, आईचा स्मृतिदिन साजरा करताना भूतकाळातील अनेक रोमहर्षक प्रसंग समोर येतात. संकट समोर दिसत असताना स्वतःच्या मुलाला देशासाठी अर्पण करणे ही मोठी धैर्याची गोष्ट आईच्या जीवन चरित्रातून आपल्याला घ्यावी लागेल. स्वातंत्र्य सैनिकांच्या संरक्षणाची, भोजनाची काळजी घेताना प्रसंगी आईला संघर्षाची भूमिका घ्यावी लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या गावच्या आर्थिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक प्रगतीसाठी आईने डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना साथ दिली. त्यांचा आदर्श आपण पुढे चालवू या.
शंकर व इंदुबाई हिरवे यांचा सत्कार
प्रारंभी हुतात्मा साखर कामगारांच्या वतीने शंकर हिरवे व इंदुबाई हिरवे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वस्त्रालंकार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. विशाखा कदम, किरणदादा नायकवडी, गौरवभाऊ नायकवडी, वीरधवल नायकवडी, सरपंच संदेश कांबळे, भगवानभाऊ पाटील, दिनकर बाबर, अरुण जाधव, वसंत वाजे, बाजीराव मांगलेकर, दादासाहेब चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी केले. जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. के. चेंडके यांनी आभार मानले.
Krantiveer Nagnathanna Naikawadi, Yashwant Patane
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या