Agarkar Puraskar News : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६७ व्या जयंतीनिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने 'गोपाळ गणेश आगरकर सुधारक पत्रकारिता पुरस्कार 2023' या राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्रातील पत्रकार तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आगरकरांचे जन्मगाव टेंभू (ता. कराड) येथे सिक्कीमचे माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेंभूच्या सुधारक शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील होते. यावेळी तहसीलदार विजय पवार, उद्योजक रामकृष्ण वेताळ, टेंभूचे सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनू फाऊंडेशनचे विश्वस्त नितीन ढापरे, विकास भोसले, माणिक डोंगरे, प्रमोद तोडकर, संदीप चेणगे, अशोक मोहने आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचा पुरस्काराने गौरव
यावेळी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोल्हापूर लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले, पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस, सातारचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर, सोलापूर येथील सांगोला नगरीचे संपादक सतिश सावंत, वृत्तनिवेदिका स्वाती गोडसे यांचा सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे उपाध्यक्ष, शेतीमित्र अशोकराव थोरात यांना प्रदान करण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पात अल्प काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आरएफओ मंगेश ताटे व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल गोरख तावरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच टेंभू येथील गोपाळ गणेश आगरकर हायस्कूलमधोल विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.
आगरकरांसारखे सुधारक तयार व्हावेत : श्रीनिवास पाटील
महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर हे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ठरतात. आज समाजात त्यांच्यासारखे असंख्य समाज सुधारक तयार होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. इंद्रधनु म्हणजे सप्तरंग. या सप्तरंगांनी आगरकरांचे समाजसुधारणेचे कार्य पुढे सुरू ठेवले हा एक आदर्श आहे. सध्या आगरकर व टिळकांसारखी निर्भीड पत्रकारिता करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
नेते - कार्यकर्त्यांना आस्था नाही : वसंत भोसले
सातारा जिल्ह्यात आगरकरांसारखी अनेक व्यक्तीमत्व घडली. जिल्ह्याला राजकीय व सामाजिकदृष्ट्या मोठा इतिहास आहे. साताऱ्याने देशाला अनेक मोठे लोकप्रतिनिधी दिले. स्वातंत्र्य चळवळीची नांदी ही याच जिल्ह्यात झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते खासदार श्रीनिवास पाटील साहेबांपर्यंतचे लोकप्रतिनिधी याच जिल्ह्यातील आहेत हे या जिल्ह्याचे भाग्य आहे. सीमा भागातील नागरिकांना महाराष्ट्राबाबत खूप आस्था आहे. मात्र सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता सध्याच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना महाराष्ट्राबद्दल आस्थाच राहिलेली नाही अशी खंत वसंत भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी उद्योजक रामकृष्ण वेताळ, बाळासाहेब आंबेकर, अशोकराव थोरात यांचीही भाषणे झाली. प्रारंभी प्रमोद तोडकर यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले, तर माणिक डोंगरे यांनी आभार मानले.
Gopal Ganesh Agarkar Sudharak Puraskar
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या