Sharad Pawar Story : यशवंतरावांचे बोट धरून पुढे जायचे


शरद पवारांचा संदेश काळजाला भिडला आणि कार्यकर्त्यांचा सागर उसळला

आपल्याला यशवंतरावांचे बोट धरून पुढे जायचे आहे हा संदेश शरद पवार यांनी आपल्या कृतीतून आणि देहबोलीतून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिला. आणि प्रीतीसंगमावर यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने या कार्यकर्त्यांनी 'आम्ही तुमच्यासोबत आहोत' हा विश्वास शरद पवार यांना दिला. यशवंत विचारांबरोबरच सामान्य माणूस आणि कार्यकर्ता ही आपली शक्ती आहे हे शरद पवार यांनी आजच्या कराड दौऱ्यातून महाराष्ट्राला दाखवून दिले.

- गजानन चेणगे 

Sharad Pawar Story : शरद पवार यांनी आपल्या नव्या लढ्याची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून करणे हे यशवंत विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तरुण कार्यकर्त्यांच्या काळजाला भिडल्यामुळे 'आम्ही तुमच्या सोबत आहोत' हा विश्वास पवारांना देण्यासाठी आज हजारोंचा जनसमुदाय ईर्ष्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र कराडमध्ये पाहायला मिळाले.

महाराष्ट्र राज्य निर्मितीत आणि जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे. त्यामुळे त्यांचा आदर्श समोर ठेवून सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. त्या यशवंतरावजींचे बोट धरून आपल्याला पुढे जायचे आहे हा संदेश आज शरद पवार यांनी आपल्या कृतीतून या तरुणाईला दिला आणि तो प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचला हे पवार यांच्या आजच्या कराड दौऱ्याचे फलित म्हणता येईल.

यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र 

१९६२ च्या चीनच्या आक्रमणावेळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची धुरा सांभाळण्यासाठी मोठ्या विश्वासाने यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यामुळे 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला' हा वाक्प्रचार मराठीमध्ये रूढ झाला. महाराष्ट्राच्या या कणखर सह्याद्रीविषयी जनतेच्या मनात नितांत आदर आणि श्रद्धा कायम आहे. बेरजेचे राजकारण हे यशवंत विचाराचे सूत्र मानले जाते. शरद पवार हे त्या महान व्यक्तिमत्त्वाचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यशवंत विचारांवर निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पवारांचे वेगळे स्थान आहे. 

यशवंतरावांचे बोट सोडणारे भरकटले

यशवंतरावांच्या आत्मचरित्रात आईसोबत पंढरपूरच्या यात्रेला गेल्याची आठवण आहे. 'माझे बोट धरून चाल, नाहीतर चुकशील' असे त्यांच्या आईने छोट्या यशवंतला सांगितले होते. तो दाखला आजही दिला जातो. यशवंतरावांच्या विचारांचे बोट सोडणारे भरकटले असा त्याचा मतितार्थ आहे.

यशवंत विचारांचा कार्यकर्ता रोमांचित 

रविवारी भाजपच्या सत्तापिपासू राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसवरही घाला घातला गेला तेव्हा शरद पवार यांनी सोमवारी सकाळी आपण कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी जात आहोत, समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा नव्या दमाने लढाईला सुरुवात करणार आहोत याचे सूतोवाच केले होते. त्यावेळीच यशवंत विचारांची सदैव पाठराखण करणारा सातारा, सांगली, कोल्हापूर पट्ट्यातील कार्यकर्ता रोमांचित झाला होता. पवारांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेने हा कार्यकर्ता ईर्ष्येने पेटून उठला आणि हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. या अलोट गर्दीने पवित्र प्रीतीसंगमाचा परिसर शहारून आणि मोहरून गेला.

प्रीतीसंगमावर यशवंतरावांच्या समाधीच्या साक्षीने या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी 'आम्ही तुमच्यासोबत आहोत' हा विश्वास शरद पवार यांना दिला. शरद पवार यांना हीच ऊर्जा कराडमधून अपेक्षित होती. आपल्याला यशवंतरावांचे बोट धरून पुढे जायचे आहे हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून आणि देहबोलीतून सर्वांना दिला. यशवंत विचारांबरोबरच सामान्य माणूस आणि कार्यकर्ता ही आपली शक्ती आहे हे शरद पवार यांनी आजच्या कराड दौऱ्यातून महाराष्ट्राला दाखवून दिले.

Sharad Pawar blew The trumpet of a new battle against BJP and Ajit Pawar from Yashwantrao Chavan's Karad 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या