Satara News : सातारा जिल्हा बँकेचा अमृत महोत्सव


आगामी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन - नितीनकाका पाटील

Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक १५ ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने आगामी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांनी दिली. 

जिल्हा बँकेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजापुरे, दत्तानाना ढमाळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कराडहून येणार यशवंत ज्योत 

नितीन पाटील पुढे म्हणाले, १५ ऑगस्ट रोजी बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने स्वातंत्यदिनाच्या पूर्वसंध्येला कराड ते सातारा यशवंत ज्योत आणण्यात येणार असून ही यशवंत ज्योत कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण समाधी स्थळी प्रज्वलित करण्यात येणार आहे. तेथून ही ज्योत राष्ट्रीय महामार्गावरून बँकेचे शंभर कर्मचारी साताऱ्यात आणणार आहेत. 

साताऱ्यात राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आबासाहेब वीर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सकाळी आठ वाजता ही ज्योत बँकेच्या मुख्यालयाच्या आवारात येणार आहे. या ज्योतीचे स्वागत रामराजे नाईक - निंबाळकर करणार आहेत. येथे सकाळी आठ वाजता स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण होणार आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांना कर्ज योजनांची माहिती देणाऱ्या 'अमृतकुंभ' पुस्तिकेचे प्रकाशन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यशाळा 

सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत ऊस उत्पादन वाढीसाठी जिल्हा बँक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) व जिल्ह्यातील साखर कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये कृषी पर्यटन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला एमटीडीसी व्यवस्थापक एस. आर. करमरकर ऍग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन (पुणे) यांचे पांडुरंग तावरे व वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र (सोलापूर) यांचे राजू भंडार कवठेकर यांना आमंत्रण देण्यात आले आहे. 

नोव्हेंबर २०२३ मध्ये कृषी विद्यापीठातील तज्ञांचे मार्गदर्शन, जानेवारी २०२४ मध्ये शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा, त्यानंतर आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, फेब्रुवारी २०२३ मध्ये बनवलेली लागवड योजना व क्षारपड जमीन सुधार योजना या अनुषंगाने शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रोजगार संधी मेळावा, महिला बचत गट मेळाव्याचे व प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.

सेवा संस्थांकरिता विशेष कार्यक्रम

जिल्हा बँकेने विकास सेवा संस्थांकरता विशेष कार्यक्रम राबविण्याचे ठरवले आहे. वसुली हंगामात वसुलीचे नियोजन करून ३० जून २०२४ पर्यंत संस्था पातळीवर ९५ टक्केपेक्षा जास्त वसुली करणे, संस्थांची नफा क्षमता वाढविणे व मार्च २०२४ अखेर बँक संलग्नित ९६० विकास सेवा संस्थांना लाभांश वाटप करणे इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या बँकेच्या प्रवाहात आणून त्यांच्यासाठी कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील पगारदार नोकर पतसंस्थांसाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. 

साडेसात हजार वृक्षांची लागवड

बँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त बँकेच्या वाटचालीची माहिती विशद करणारी विशेष स्मरणिका या निमित्ताने प्रकाशित केली जाणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात बँकेच्या वतीने साडेसात हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालय येथे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, बँक अधिकारी - सेवकांच्या क्रीडा स्पर्धा, उत्कृष्ट शाखांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन्मानित करणे, गड किल्ल्यांचे संवर्धन, स्वच्छता मोहिमांचे आयोजन, ग्राहकांच्या सेवेकरिता अमृत ठेव कलश योजना, बँक आपल्या दारी, डिजिटल बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, एटीएम कार्डचे वाटप करणे किंवा क्यूआर कोड विकसित करणे, युपीआय, मोबाईल बँकिंग सुविधा यांचा प्रसार प्रचार करणे इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. 

जुलैमध्ये होणार सांगता समारंभ

अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ जुलै २०२४ मध्ये होणार आहे. यानिमित्ताने एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारतीय रिझर्व बँक व नाबार्डचा अधिकारी तसेच सहकार विभागाचे विशेष निमंत्रित यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Satara district Central co - operative Bank 75 years celebration, organise various programs, Ramraje Naik Nimbalkar, former speaker of Maharashtra legislative council 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या