औषधे गळ्यात मारणारी टोळी गजाआड; तळबीड पोलिसांची कामगिरी
Satara News : अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालून औषधे गळ्यात मारणारी परजिल्ह्यातील भोंदूगिरी करणारी गुन्हेगार टोळी गजाआड करण्यात तळबीड (ता. कराड, जि. सातारा) पोलिसांना यश आले आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना अशाप्रकारे भोंदूगिरी करणार्या या टोळीकडून जिल्ह्यात अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल धरमगिरी गोसावी (वय ३२, रा. तिरंगानगर, साक्री, ता. साक्री, जि. धुळे), त्याच्याबरोबर असणारे साथीदार अश्विन अशोक गोसावी (वय ३४, रा. गोसावीवस्ती, वैद्यवाडी, हडपसर, पुणे, मुळ गाव वाकोत, ता. जामनेर, जि. जळगाव), शैलेश सुरेश गोसावी (वय २२, रा. तिरंगानगर, साक्री), दैवेद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३२, रा. सुशिलानगर, साक्री) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
विश्वास संपादन करून फसवणूक
जिल्ह्यात अशी टोळी कार्यरत असून त्या टोळीकडून तळबीड येथील एका दांपत्याची फसवणूक फसवणूक झाल्याची माहिती बुधवारी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना मिळाली. त्याबाबत त्यांनी तळबीड पोलीस ठाण्याला सूचना दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित दांपत्याशी चर्चा करून याबद्दल माहिती घेतली. त्यावेळी या रॅकेटची कार्यपध्दती समोर आली. संबंधित दांपत्य मुलबाळ होत नसल्याने चिंताग्रस्त होते. असे सावज शोधण्यात माहीर असलेल्या नारायण वाघ असे नाव सांगणार्या तथाकथित वैद्याने २१ जुलै २०२३ रोजी या दांपत्याशी फोनवरून संपर्क करून, तुम्हाला आपल्याकडील औषधाने मूल होऊ शकते, ते औषध मी मोफत देतो, फक्त आमच्या मठाची ११ हजार रूपयांची पावती घ्यावी लागेल असे सांगितले. यातून त्याने दांपत्याचा विश्वास संपादन केला. त्याच दिवशी चार लोक टाटा पंच (एमएच १८ बीएक्स ४५६०) कारमधून त्यांच्याकडे आले. अपत्य होण्यासाठी औषध देतो, पण ती औषधे महाग आहेत, तुमची तुम्ही आणा असे त्यांनी दांपत्याला सांगितले. मात्र त्यानंतर वेळोवेळी त्यांच्याकडे येऊन जवळची व सातारा येथील शाही एजन्सी या आयुर्वेदिक मेडिकलमधून १ लाख ७६ हजार ५०० रूपयांची औषधे आणून दिली.
जे सांगितले ते निघाले खोटे
दि. १४ ऑगस्ट रोजी पुन्हा तळबीड येथे येवून त्या दांपत्याची मेडीकलमधील किटने टेस्ट करुन ही महिला गरोदर असल्याचे या टोळक्याने सांगितले. तथापि, ही टेस्ट कोणत्याही डॉक्टरकडून करु घेऊ नका, नाहीतर ती टेस्ट निगेटीव्ह येईल असे त्यांनी बजावले. तसेच पुन्हा त्यांना २ लाख ६० हजार रुपयाची औषधे घ्या असे सांगितले. तेव्हा या दांपत्याला या प्रकाराचा संशय आल्याने ते सांगत असलेल्या औषधासाठी आता आमच्याकडे पैसे नाहीत. पैसे जमले की सांगतो असे सांगून त्यांना पाठवून दिले. नंतर ती टोळी त्यांना औषध घेण्यासाठी वारंवार फोन करीत होती. म्हणून त्यांनी कराड येथील डॉक्टरकडे नियमित टेस्ट केली तसेच सोनोग्राफी केली असता ती महिला गरोदर नसल्याचे समजल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
भोंदू वैद्याचे नावही बोगसच
याबाबत या लोकांविरुध्द बुधवारी (दि. १६) तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली. त्याच दिवशी या टोळीचे लोक पुन्हा तळबीड येथे आले असल्याची माहिती दांपत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, पोलीस हवालदार आप्पा ओंबासे, पोलीस नाईक योगेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अभय मोरे यांनी टोळीतील लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता जो इसम नारायण वाघ वैद्य म्हणून सांगत होता, त्याचे खरे नांव राहुल धरमगिरी गोसावी (वय ३२, रा. तिरंगानगर, साक्री, ता. साक्री, जि. धुळे) असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीने सातारा जिल्ह्यात बर्याच लोकांना गंडा घातला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करत आहेत.
Sakri, Dist. Dhule, Talbeed Police Station
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या