Satara News : फायनान्स कंपनीला शिवसेनेचा हिसका


मनमानीविरोधात जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांचा आक्रमक पवित्रा

Satara News : फायनान्स कंपन्यांच्या मनमानीविरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते चांगलेच आक्रमक झाले. हप्ता थकल्याचे कारण पुढे करत जबरदस्तीने गाडी ओढून आणल्याची तक्रार आलेल्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्यांनी शिवसैनिकांसह जाऊन अधिकार्‍यांना याचा जाब विचारला. शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संबंधित कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची बोलती बंद झाली. अखेर थातुरमातुर उत्तरांनी सारवासारव करत त्यांना माफी मागावी लागली.

नागरिकांना विविध कारणांसाठी वेळप्रसंगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घ्यावे लागते. या कर्जांच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून काही एजन्सीजची नेमणूक केली जाते. त्या एजन्सीचे लोक दांडगाईने गाड्या ओढून नेतात. असे प्रकार फायनान्स कंपन्यांकडून वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

झालेल्या प्रकाराचा विचारला जाब 

अशाच पध्दतीने कर्जावर घेतलेली शिवसेना महिला आघाडीच्या जावली तालुका संघटक गीता शेलार यांची चारचाकी गाडी हप्ता थकल्यामुळे येथील पोवई नाका परिसरातून भर रस्त्यावरुन टाटा मोटर्स फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी ओढून नेली. याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकार्‍यांना समजली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, तालुकाप्रमुख सागर रायते, श्रीकांत पवार, शहरप्रमुख शिवराज टोणपे, अनिल गुजर, मंदार भांडवलकर, इम्रान बागवान, युवासेनेचे सागर धोत्रे, किशोर घोरपडे, ज्ञानेश्वर शेलार, हरिभाऊ पवार, अजय सावंत, राम घोरपडे आदी शिवसैनिकांनी टाटा मोटर्स फायनान्स कंपनीच्या कार्यालयामध्ये धाव घेत झालेल्या प्रकाराचा जाब विचारला. 

गुन्हा दाखल करणार म्हटल्यावर माफी

यावेळी फायनान्स कंपनीचे कर्मचारी व शिवसैनिक यांच्यात वादावादीही झाली. दोन हप्ते थकल्यास गाडी ओढून आणण्याचा अधिकार असल्याचा लेखी आदेश दाखवा या मुद्यावर जिल्हाप्रमुख सचिन मोहिते अडून बसले. तसेच गाडी ओढून आणणार्‍या कर्मचारी व संबंधित फायनान्स कंपनीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले, तेव्हा तेथील अधिकारी - कर्मचार्‍यांची चांगलीच तंतरली. त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल सारवासारव करत माफी मागितली. दरम्यान, हा प्रकार सावकारीपेक्षा घातक असून अशा गोष्टींवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी; अन्यथा शिवसेनेच्या पध्दतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला.

Satara District Shivsena [Uddhav Balasaheb Thackeray], Finance Company, Satara Police 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या