इतके महागडे औषध घेऊनही उपयोग न झाल्याने फुटली प्रकरणाला वाचा
गजानन चेणगे
Satara News : तळबीड प्रकरणात अपत्य प्राप्तीसाठी दिल्या गेलेल्या औषधाची किंमत ऐकलीत तर मती गुंग होऊन जाईल. मूल व्हावे म्हणून कासाविस असलेल्या दांपत्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत भामट्यांनी त्यासाठीचे 'दिव्य' औषध सोन्यापेक्षाही महाग, म्हणजे एका ग्रॅमला १७ हजार ५०० रुपयेप्रमाणे त्यांच्या गळ्यात मारल्याचे निष्पन्न झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे इतके महागडे औषध घेऊनदेखील यश न आल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
निपुत्रिकाचे जीणे वाट्याला येऊ नये म्हणून अपत्य प्राप्तीसाठी वाटेल ती किंमत मोजण्यास लोक कसे तयार असतात याची साक्ष देणारे जळजळीत वास्तव तळबीड प्रकरणामुळे प्रकाशात आले आहे.
विवाह झाल्यानंतर सर्वसाधारण विशिष्ट कालावधीत मुलबाळ व्हावे अशी त्या नवदांपत्यासह त्यांच्या कुटुंबीयांचीही अपेक्षा असते. मात्र ती गोड बातमी समजण्यास जसा विलंब होत जाईल तशी सर्वांचीच अस्वस्थता वाढत जाते. घरच्यांसह 'नसती उठाठेव'वाल्या यासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे देणे त्या दांपत्याला अवघड होऊन जाते.
दांपत्यांच्या अगस्तिकतेचा गैरफायदा
वैद्यकीय तपासण्या उपचार याची मदत घेऊनही हेतू साध्य होत नाही, तेव्हा मग त्या दांपत्याची अस्वस्थता कमालीची वाढते आणि मूल होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास ते तयार होतात. त्यांच्या या मानसिकतेचा गैरफायदा घेतला गेल्याचे तळबीडच्या प्रकरणातून उघडकीस आले आहे.
तळबीड येथील एका दाम्पत्याला मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते. अशा सावजांच्या सतत शोधात असलेल्या धुळे व जळगाव जिल्ह्यातील आरोपींनी या दांपत्यावर आपले मोहजाल टाकले. आपले नाव नारायण वाघ असून आपल्याला माहित असलेल्या एका औषधाने तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल. त्या औषधाचे पैसे नकोत, पण आमच्या मठाची अकरा हजार रुपयांची पावती फाडावी लागेल असे त्याने सांगितले.
पहिला दणका पावणेदोन लाखांचा
संबंधित कुटुंबाचा विश्वास संपादन करत हा भामटा व त्याच्या सहकाऱ्यांनी एका ग्रॅमला १७ हजार ५०० रुपये दराने यासाठीचे औषध घेण्यास प्रवृत्त केले. काही दिवस मधासोबत या औषधाचे चाटण घ्यावे असे या टोळीने सांगितले होते. या भोंदूगिरी करणाऱ्यांच्या बतावणीला बळी पडून संबंधित कुटुंबाने दांपत्याने जवळपास पावणे दोन लाख रुपये मोजून दहा ग्रॅम औषध घेतले.
वैद्यकीय टीम असल्याचा बनाव
कोर्स सुरू केल्यानंतर काही दिवसांनी ही टोळी वैद्यकीय टीम असल्याच्या थाटात या दांपत्याच्या घरी पोहोचली. तिथे काही प्राथमिक तपासण्या करण्याचा फार्स करत संबंधित महिला गरोदर असल्याचे सांगितले. पण अन्य ठिकाणी तपासण्या करू नका असेही त्यांनी बजावले. त्याचप्रमाणे औषधांचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी २ लाख ६० हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. इतकेच नव्हे तर त्यासाठी त्यांच्यावर दडपण आणण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्यातून त्या दांपत्याचा संशय बळावत गेला.
... आणि टोळी अलगदपणे अडकली
कराडला दवाखान्यात तपासण्या केल्यानंतर ती महिला गरोदर नसल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाली हे सिद्धच झाल्यामुळे संबंधित दांपत्याने तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रार दाखल केल्या दिवशीच ही टोळी दांपत्याकडे रक्कम घेण्यासाठी आली होती. आणि याबाबत दांपत्याने पोलिसांना संकेत दिल्यानंतर ही टोळी अलगदपणे पोलिसांच्या हाताला लागली.
Medicine for child birth, cheating of couple, racket destroyed by Talbid police, Satara Police, Criminals from Satara, Dhule and Jalgaon districts.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या