Satara News : संबोधी प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी सर्वोत्तमाचा ध्यास आवश्यक - प्राचार्य डॉ. मेनकुदळे

Satara News : स्पर्धेच्या युगात टिकाव लागण्यासाठी बदलत्या काळानुसार सर्वोत्तमाचा ध्यास व बौद्धिक क्षमता मिळवणे आवश्यक असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

सातारा येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील सुमारे तीस शाळा - महाविद्यालयातील दहावी व बारावीतील एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी व खुल्या अशा सर्व प्रवर्गातील शंभरपेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. मेनकुदळे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या हस्ते संविधान, विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विविध विषयावरील पुस्तके व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त प्राचार्य डॉ. संजय कांबळे, डॉ. सुवर्णा यादव उपस्थित होते.

कठोर परिश्रमाला पर्याय नाही

शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. त्याला तोंड देण्यासाठी विचारावर व पुस्तकावर प्रेम करणारे विद्यार्थी घडविण्याचे मोठे आव्हान आहे. विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांनी संशोधनाच्या नव्या दिशा ओळखून त्या दिशेने सखोल अभ्यास करून बुद्धिमत्ता कमावणे गरजेचे आहे. आपल्या गुणवत्तेला अर्थ प्राप्त करायचा असेल तर आईवडील व देश यांच्याप्रती आदराची व प्रेमाची भावना ठेवण्याची व चांगला समाज निर्माण करण्याची गरज आहे. उच्च प्रतीचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व कठोर परिश्रमाला पर्याय नाही. मोबाईल वापराचा अतिरेक झाल्यामुळे पालक व पाल्यांचा संवाद हरवला आहे. तो दुरुस्त झाला पाहिजे, असे विचार प्राचार्य डॉ. मेनकुदळे यांनी मांडले. संबोधी प्रतिष्ठान नवा समाज घडवण्याचे मौलिक काम करीत आहे, अशा शब्दात त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली.

महापुरूषांच्या प्रेरणेतून यश मिळवता आले - भाग्यश्री फरांदे

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मला उज्ज्वल यश संपादन करता आले आहे. प्रत्येकाने उत्तम प्रकारचा माणूस, नागरिक होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आत्मविश्वास, गांभीर्य आणि वैचारिक अधिष्ठानाची गरज आहे. निकोप समाज घडविण्याची जबाबदारी आपल्यावर असून त्यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे भाग्यश्री फरांदे म्हणाल्या.

विद्यार्थ्यांच्या वतीने शाहू शरद गायकवाड, सृष्टी शांताराम वाघ व प्रणव राजेंद्र काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच परिवर्तनवादी कार्यकर्ते, विचारवंत प्रा. हरी नरके, शेखर सोनाळकर व कवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. यशपाल बनसोडे, भास्कर फाळके, शाहीर श्रीरंग रणदिवे, जनार्दन घाडगे, अनिल वीर, प्रकाश खटावकर यांच्यासह पालक, विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Sambodhi Pratishthan, Rayat Shikshan Sanstha, Mahatma Phule, Sawitribai Phule, Rajarshi Shahu Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या