शेतकर्यांचे जीवनमान उंचावणार्या सातारा जिल्हा बँकेचे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेच्या जीवनात आर्थिक समृध्दी आणण्यासाठी मजबुतीने काम करत असलेली व उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय पातळीवर सातत्याने गौरवली जात असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वातंत्र्यदिनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त बँकेच्या सात दशकातील यशस्वी वाटचालीचा मागोवा...
प्रगतीदर्शक वाटचालीचा पहिला टप्पा
बँकेचे पहिले चेअरमन म्हणून बाळासाहेब देसाई आणि व्हाईस चेअरमन म्हणून निळकंठराव कल्याणी यांची निवड झाली. दि. ११ नोव्हेंबर १९५० रोजी मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ सातारा येथील कन्या शाळेजवळच्या एका जुन्या घरात झाला. शेतकर्यांना पीक लागवडीसाठी अल्पमुदत कर्जपुरवठा सुरु केला. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी जनतेला बँकिंग सुविधा उपलब्ध करुन दिल्या. अल्पमुदत पीक कर्जाबरोबरच बँकेने कृषि व कृषीपूरक प्रत्येक कारणासाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा सुरु केला. यामध्ये प्रामुख्याने १९६२ मध्ये जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी योजना प्रभावीपणे राबवण्यात आली. प्रगतीदर्शक वाटचालीमुळे स्वतंत्र इमारतीची गरज निर्माण झाली. शिवाजी सर्कल, सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 'किसान भवन' ही प्रशस्त वास्तू बांधण्यात आली. या वास्तुचे उद्घाटन तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व राज्याचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते दि. ७ एप्रिल १९६६ रोजी झाले.
सन १९७१ ते १९८१ या दशकात सह्याद्री, कृष्णा, अजिंक्यतारा, किसन वीर सहकारी साखर कारखाने उभारणीसाठी बँकेने अर्थसहाय्य उपलब्ध केले. तसेच बँकेच्या अर्थसहाय्यातून जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा संस्था उभ्या राहिल्या. कोरडवाहू क्षेत्र बागायती झाल्याने हरित क्रांती झाली. शेतकर्यांना ऊस पिकासाठी कर्ज उपलब्ध केल्यामुळे ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली व साखर कारखान्यांच्या ऊसाच्या गरजेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. यातून यशवंतराव चव्हाण यांचे कृषी व औद्योगिक विकासाचे स्वप्न खर्या अर्थाने साकार झाले.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाला चालना
सन १९८१ ते १९९१ च्या दशकात जिल्ह्याच्या बागायत क्षेत्रात वाढ होणेसाठी बँकेने इलेक्ट्रिक मोटर पंपसेट, पाईपलाईन, लघुसिंचन योजनांसाठी कर्ज पुरवठा सुरु केला. त्याचबरोबर शेतकर्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळावा या दूरदृष्टी विचाराने बँकेच्या संचालक मंडळाने केंद्र शासन, नाबार्ड व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शन व मान्यतेने इस्राईल ते अमेरिका यासारख्या अत्याधुनिक शेती करणार्या देशांचा अभ्यास दौरा करून, विविध प्रकारच्या शेती प्रकल्पांचा व पूरक उद्योगांचा अभ्यास केला व त्यास अनुसरून जिल्ह्यातील पारंपरिक शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान व व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध योजना कार्यान्वित केल्या. जिल्यातील पारंपारिक शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करणे या योजनांची व्याप्ती विचारात घेऊन बँकेने १९८८ साली तांत्रिक देखरेख आणि मुल्यांकन (टी. एम. ई.) विभागाची स्थापना केली. पाण्याच्या बचतीसाठी व जादा उत्पादनासाठी ठिबक व तुषार सिंचन योजना कार्यान्वित केल्या. शेती व्यवसायातील मनुष्यबळाची कमतरता विचारात घेवून बँकेने कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मळणीयंत्र, पेरणी यंत्र, पीक काढणी यंत्र, औषध फवारणी यंत्र इत्यादिसाठी कर्जपुरवठा सुरु केल्या. शेतकर्यांच्या निवार्यासाठी शेतकरी निवास कर्ज योजना कार्यान्वित केली.
सन १९९६ मध्ये बँकेने हायटेक विभाग सुरू करून उच्च तंत्रज्ञानाची शेती करण्याचा मूलमंत्र शेतकर्यांना दिला. यामुळे ग्रीन हाऊसमधून जरबेरा, कार्नेशन इत्यादी फुलशेतीबरोबरच रंगीत ढोबळी मिरचीच्या उत्पादनातून अशा शेतीमालाला देशांतर्गत मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. उत्पादित मालाला अभयसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या `अजिंक्यतारा फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्थेमार्फत' देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन देऊन लक्षणीय कामकाज केले. सातारा जिल्हा हा 'ग्रीन हाऊसचा जिल्हा' म्हणून ओळखला गेला. जिल्ह्यातील शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरिता बँकेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकर्यांना एकत्रित करून जिल्ह्यात ६५० शेतकरी मंडळाची स्थापना केली. तसेच 'यशवंत किसान विकास मंच' स्थापन केला.
शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी देशातील पहिलीच बँक
जिल्ह्यामध्ये १०.५० लाख महसुली खातेदार असून, त्यापैकी ६ लाख ४९ हजार सोसायटीचे सभासद आहेत. त्यापैकी ३ लाख ५० हजारहून अधिक शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक तसेच शेतीपूरक कर्ज पुरवठा विकास संस्थांच्या माध्यमातून केला जात आहे. शेतकर्यांना तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणारी जिल्हा बँक ही राज्यात नव्हे तर देशातील पहिलीच बँक आहे. सन २०१०-२०११ सालापासून आजपर्यंत याकरिता बँकेने ३२.२० कोटी रुपये इतकी रक्कम बँकेच्या नफ्यातून शेतकर्यांना अदा केली आहे. तसेच बँकेने मध्यम व दीर्घ मुदती कर्जामध्ये वेळेत परतफेड केलेल्या शेतकर्यांना ४ ते ८ टक्केपर्यंत व्याज सवलत दिली आहे.
शेती व शेतीपूरक व्यवसायाव्यतिरिक्त व्यक्ती ग्राहकांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने सन १९९७ साली बँकेने व्यक्ती थेट कर्ज विभाग कार्यान्वित केला. या विभागांतर्गत ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन सायकल खरेदीपासून ऊस तोडणी यंत्राकरिता कर्ज पुरवठा करण्यासाठी जवळपास ३० हून अधिक योजना राबवल्या. जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मुलांना व्यावसायिक उच्च शिक्षण घेता यावे याकरिता शैक्षणिक कालावधी सुरू असेपर्यंत शून्य टक्के दराने देशांतर्गत ३० लाख व परदेशात ४० लाख रूपये कर्ज पुरवठ्याचे धोरण स्वीकारले आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
संचालक मंडळाने भविष्यवेधी विचार समोर ठेऊन नूतन प्रशासकीय इमारतीसाठी जिल्हा परिषदेसमोर जागा खरेदी केली आणि दि. २४ नोव्हेंबर २००६ रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले. त्याबरोबरच बदलत्या बँकिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाची गरज भासू लागल्याने बँक अधिकारी, सेवक तसेच विकास सोसायटीचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या पदाधिकारी यांच्यासाठी बँकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीमध्ये 'यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र' स्थापन केले. संगणक कामकाजावर नियंत्रण ठेवणेसाठी जुन्या इमारतीमध्येच स्वत:चे अद्ययावत व प्रशस्त 'डेटा सेंटर' उभारले.
सन २०१३ मध्ये सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीमध्ये जोडून ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे आधुनिक बँकिंग सुविधा व तत्पर सेवा देण्यास सुरुवात केली. शेतकरी सभासदांकारिता बँकेने ७/१२ व खाते उतारा सर्व शाखामधून मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बँक स्वत:च्या प्रगतीबरोबरच सलग्न विकास संस्थांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून, सभासद पातळीवर १०० टक्के कर्ज वसुली करणार्या विकास संस्थांना दरवर्षी बँकेच्या नफ्यातून वसुली बक्षीस म्हणून प्रत्येक संस्थेस ३० हजार रूपये इतका निधी दिला जात आहे.
विकास सोसायट्यांचे सक्षमीकरण
जिल्ह्यामध्ये एकूण ९६० विकास सेवा संस्था असून त्यांच्या व्यवस्थापन खर्चावर नियंत्रण, व्यवसाय वृध्दी, कर्जवाटपामध्ये भरघोस वाढ, प्रभावी वसुली तसेच संस्था सक्षम होण्यासाठी इतर व्यवसाय सुरु करणे याविषयी मार्गदर्शन केल्यामुळे चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या ९४० विकास सोसायट्या नफ्यात आणण्यात बँकेस यश मिळाले असून भविष्यात सर्व विकास संस्था नफ्यात आणण्याचा बँकेचा मानस आहे. महिला सबलीकरण व सक्षमीकरणाअंतर्गत ३२ हजार ६४९ स्वयंसहाय्यता बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. पैकी जवळपास १८ हजारहून अधिक गटांना ३५ कोटीहून अधिकचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. सन २००८ पासून राज्यात सर्वप्रथम ४ टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणारी सातारा जिल्हा बँक ही देशातील एकमेव बँक आहे. यामुळे बचत गटांच्या लघुउद्योग व्यवसायाला चालना मिळाली आहे.
बँक सेवकांकरिता गृह कर्जावर व्याज सवलत, गंभीर आजार व अपघातासाठी विशेष रजा, बँक सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर बँकेत नोकरी हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, कर्मचार्यांच्या वारसांना विविध माध्यमातून जवळपास ५० ते ६० लाखांची मदत दिली जाते. बँक सेवकांकरिता सातार्यामध्ये अल्प दरामध्ये 'वेणुग्राम' हा सेवकांचा गृह संकुल उभारण्याचा प्रकल्प संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सेवकांनी एकत्र येऊन सुरु केला आहे.
सामाजिक बांधिलकीतून सेवाकार्य
सन २०१७-१८ च्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी बँकेने चारा छावण्यांसाठी भरीव मदत करून चारा व पशुखाद्य वाटपामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. त्यानंतर सलग दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टीतही बँकेने बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी भरीव मदत केली आहे. सन २०२० मध्ये कोविड-१९ या जागतिक महामारीच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एकूण २ कोटी १६ लाख मदत दिली आहे. तसेच बँकेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करून जिल्ह्यातील स्थलांतरित, मोल मजुरी करणारे मजूर व गरजू कुटुंबाना वाटप केले आहे. यासाठी १ कोटी रुपये खर्च केले आहेत.
कोरोना काळात बँकेच्या वयोवृध्द पेन्शनर ग्राहकांना व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत असलेल्या ग्राहकांना बँक सेवकामार्फत घरपोहोच पेन्शन रक्कम दिली गेली आहे. सातारा येथे नव्याने सुरु झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी १५ लाखाची मदत केलेली आहे. बँकेने २०१८ साली पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना जलसंधारनासाठी रुपये १ कोटी, २०१९ साली सातारा जिल्ह्यात भीषण दुष्काळामध्ये पाणी टंचाई काळांत २ कोटी रुपये खर्च करून दुष्काळग्रस्त भागात टॅकरने पाणी वितरण करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.
सेवेतील सातत्य व कामकाजातील गुणवत्ता यामुळे देशविदेशातील विविध मान्यवर, बँकिंग व सहकार क्षेत्रातील संस्था यांना रिझर्व्ह बँक, नाबार्ड व देशपातळीवरील महत्वपूर्ण आर्थिक संस्था यांच्यामार्फत सातारा जिल्हा बँकेच्या कार्यपद्धतीचा अभ्यासासाठी वेळोवेळी भेटी देत असतात. बँकेच्या अनिष्ठ तफावत तसेच अनुत्पादक कर्जे व्यवस्थापनाचा अभ्यास 'बर्ड' लखनौ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नाबार्ड संचालित संस्थेने केला असून बँकेचे धोरण राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आले आहे.
बँकेच्या एकूणच दैदिप्यमान प्रगतीचा आढावा घेतला असता पहिले वर्ष वगळता बँक स्थापनेपासून नफ्यात असून, बँकेस सतत ऑडीट वर्ग 'अ' आहे. बँकेचे २ लाखाने सुरु केलेले भागभांडवल ७ दशकाच्या वाटचालीनंतर २८७ कोटींहून अधिक झाले आहे. बँकेचा सुरुवातीचा व्यवसाय १५ लाख होता तो ७ दशकांच्या वाटचालीनंतर १५ हजार कोटींहून अधिक झाला आहे. बँकेने सन १९६२ पासून सभासदांना ४ टक्केने लाभांश वाटपास सुरुवात केली असून जास्तीत जास्त २० टक्केपर्यंत लाभांश वाटप केला आहे. सन १९९२ पासून सतत २१ वर्षे बँकेने १० टक्केहून अधिक लाभांश वाटप केला आहे. बँकेचा निव्वळ एनपीए सतत १६ वर्ष 'शून्य' टक्के आहे. बँकेची वसुली टक्केवारी कायमच ९५ टक्केहून अधिक असून, सामाजिक बांधिलकी जपत, अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सुविधांच्या माध्यमातून अविरत ग्राहक सेवा इत्यादी बँकेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
उत्कृष्ट कामकाजाचा पुरस्कारांनी गौरव
याचीच फलश्रुती म्हणून बँकेस नाबार्ड, केंद्र शासन, राज्य शासन, महाराष्ट्र राज्य बँक्स असोसिएशन तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थांकडून आजअखेर १०४ पुरस्कारांनी गौरविले आहे. यामध्ये नाबार्डचे सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेचे ७ पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहेत. एका दशकातील सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नोंद झाली आहे. बँकेस आयएसओ ९००१:२०१५ या आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. बँकेच्या सात दशकाच्या वाटचालीत बँकेचे नेतृत्व केलेल्या विलासराव पाटील (उंडाळकर), केशवराव पाटील, श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, भि. दा. भिलारे (गुरुजी), बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील (वाठारकर), सदाशिवराव पोळ या मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई तसेच सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे अभ्यासू मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
Satara District Central co - operative Bank Ltd, Satara DCC 75 Years, Yashwantrao Chavan, Balasaheb Desai, R. D. Patil
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या