मारहाण करून हप्ता मागणाऱ्या गुंडांना अटक; कराड शहर पोलिसांची कामगिरी
Satara News : कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकापूरमध्ये फाळकूट दादांच्या दादागिरीचा कारनामा समोर आला आहे. कापड दुकानदाराला मारहाण करून हप्ता मागणाऱ्या चार सराईत गुंडांना कराड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र, मोटार सायकल व जबरीने चोरुन नेलेली रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
फजल उर्फ पप्पू लियाकत पठाण, शंतनु मानसिंग खराडे, रोहित सुभाष पवार व मारुती सपेरा धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राहुल राजेंद्र मासाळ यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हप्ता देण्यासाठी माजवली दहशत
मासाळ यांनी कापड दुकानाकरिता मलकापूर फाटा येथे नव्याने दुकानगाळा विकत घेतला असून त्या दुकान गाळ्यामध्ये ते आर. एम. मेन्सवेअर नावाचे कापड दुकान चालवितात. दि. १४ रोजी सायंकाळी सातच्या सुमारांस आरोपींनी कापड दुकानासमोर मोटार सायकलवरुन येऊन 'राहुल्या, बाहेर ये, तुला मस्ती आलीया, माझ्या गँगला व मला तुझ्याकडून पाच हजार रुपये हप्ता पाहिजे, चल काढ हप्ता' असे म्हणून मोठमोठ्याने आरडोओरडा, शिवीगाळ, दमदाटी करीत दहशत माजवली. हप्ता देत नसल्याचे पाहून दुकानात घुसून खिशातील चाकू काढून फिर्यादीवर वार करुन त्यांच्या खिशातील १८०० रुपये जबरीने काढून घेतले. पुन्हा आलो की राहिलेला हप्ता द्यावा लागेल असे सांगून ते निघून गेले.
कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल
याची माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सूर्यवंशी यांनी लागलीच डी. बी. प्रमुख राजु डांगे, पोलीस उपनिरीक्षक व डी. बी. टीमला आदेश दिला. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाने मलकापूर परिसरात पेट्रोलींग करुन माहितीच्या आधारे चारही फाळकुट दादांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विभुते, पोलीस उपनिरिक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस शिपाई महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.
कायमचा बंदोबस्त करणार - सूर्यवंशी
कोणी असे फाळकुट दादा कोणाकडे हप्ता मागत असतील तर त्याबाबत कराड शहर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे. अशा फाळकुट दादांचा कायमचा बंदोबस्त करणार आहे. अशा लोकांची माहिती अभिलेख पडताळण्याचे काम सुरू असुन भविष्यात त्यांच्यावर हद्दपारीसारख्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या