Satara Story : बुगडीचे भाग्य केव्हा उजळणार ?


बरेलीला झुमक्याची प्रतिष्ठापना; साताऱ्याला बुगडीच्या सन्मानाची आस
सन १९६६ साली प्रदर्शित झालेल्या 'मेरा साया' चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेल्या 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में' या गीतातील झुमक्यावर आणि आवाजातील ठुमक्यावर रसिकांनी अक्षरशः जीव ओवाळून टाकला. बरेलीच्या बाजारात ५८ वर्षांपूर्वी हरवलेला हा झुमका बरेलीच्या परसाखेडा नाक्यावर दिमाखात प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. आता प्रश्न इतकाच आहे, की झुमक्याच्याही आधी, म्हणजे ६५ वर्षांपूर्वी साताऱ्याला हरवलेल्या बुगडीचे भाग्य केव्हा उजळणार ?
- गजानन चेणगे
कला, साहित्य, गीत, संगीताने मानवी जीवन समृद्ध केले आहे. भाषा आणि साहित्याच्या मखमली पायघड्यांवरून या विविध कला हृदयापर्यंत जाऊन भिडत असतात. त्यानुसार सन १९६६ साली प्रदर्शित झालेल्या 'मेरा साया' चित्रपटातील अभिनेत्री साधनावर चित्रित झालेल्या 'झुमका गिरा रे बरेली के बाजार में' या गीताने लोकप्रियतेची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. प्रसिद्ध गीतकार - शायर राजा मेहदी अली खान यांनी रचलेले हे गीत आशा भोसले यांच्या आवाजातील अवखळ नजाकतीने तुफान लोकप्रिय झाले, इतकेच काय, उत्तर प्रदेशातील बरेली हे शहर या गीतामुळे चांगलेच प्रकाशझोतात आले. या शहराबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यात मोठे कुतूहल निर्माण झाले. 
रसिक बरेलीच्या झुमक्यावर फिदा 
गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू अशा मूर्त प्रतिकांविषयी प्रचंड संवेदनशील दिसणारे लोक अमूर्त स्वरूपातील गीत संगीतावर कसे जीव ओवाळून टाकतात हेच यातून दिसून येते. तसेच भाषा आणि साहित्याचे महत्त्वही यातून अधोरेखित होते. तसे प्रेम जनतेने उत्तर प्रदेशातील बरेलीच्या झुमक्यावर केले. बरेलीला वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या या झुमक्याचे यथोचित स्मारक उभारण्याचा विचार नव्वदच्या दशकापासून चर्चेत होता. लखनौ - दिल्ली महामार्गावर (महामार्ग क्रमांक २४) बरेलीच्या प्रवेशद्वारावर परसाखेडा नाक्यावर हा झुमका उभारण्याची मागणी बरेली विकास प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. बरेलीकरांचे ते स्वप्न तब्बल पाच दशकांनी सत्यात उतरले. या झुमक्याचे लोकार्पण करण्यात आले.
६६ वर्षानंतरही बुगडीचे गारुड कायम
लोकांनी जितके प्रेम बरेलीच्या झुमक्यावर केले, तितकेच किंबहुना त्यापेक्षाही काकणभर अधिक सातारच्या बुगडीवर केले. योगायोग असा, की 'झुमका गिरा रे' आणि 'बुगडी माझी सांडली गं' ही दोन्ही गाणी आशा भोसले यांनीच गायली आहेत. भाषाप्रभू ग. दि. माडगूळकर यांच्या या लावणीला वसंत पवार यांचे संगीत लाभले आहे. त्यांचे सहाय्यक संगीतकार राम कदम यांना या लावणीची चाल कशी सुचली ती एक रंजक कथा आहे. १९५९ साली प्रदर्शित झालेल्या 'सांगत्ये ऐका' चित्रपटातील अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेली ही ठसकेबाज लावणी त्यांच्या अदाकारीने खऱ्या अर्थाने अजरामर झाली. ६६ वर्षानंतरही बुगडीचे गारुड कायम आहे. आजही कोणतीही मैफल बुगडीशिवाय परिपूर्ण होत नाही. मग झुमक्याच्याही सात वर्षे आधी साताऱ्याला गेल्यावर हरवलेल्या बुगडीचे नशीब केव्हा उघडणार ? बरेलीप्रमाणे सातारकर बुगडीला अमरत्व मिळवून देणार का ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीसोबतच मराठी चित्रपट सृष्टीच्या वैभवकाळाची आठवण म्हणून हा अनमोल ठेवा अशा पद्धतीने जतन केल्यास सर्वांनाच आनंद होईल.
झुमका... तांब्या - पितळेचा, दोन क्विंटलचा !
बरेलीच्या प्रवेशद्वारावर परसाखेडा नाक्यावर १४ फूट उंच खांबावर हा झुमका उभारण्यात आला असून बरेलीतील तो एक लँडमार्क झाला आहे. गुरुग्राम येथील एका कलाकाराने हा झुमका तयार केला असून त्यासाठी पितळ आणि तांबे या धातूंचा वापर केला आहे. या झुमक्याचे वजन दोन क्विंटल इतके असून यासाठी अठरा लाख रुपये इतका खर्च आल्याचे सांगितले जात आहे.
Film Mera Saya, Jhumka gira re Bareilly ke bajar mein, Sangtye aika, Bugadi mazi sandli ga, Actress Jayashree Gadkar, Song by Asha Bhosale

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या