Satara News : सातारच्या उमेदवारीबाबत भाजपचे मौनव्रत


भाजपची भूमिका संभ्रम वाढवणारी; महाविकास आघाडीचे 'वेट अँड वॉच'

उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी कन्फर्म धरून त्यांच्या समर्थकांनी बुधवारी जिल्ह्याच्या सीमेपासून साताऱ्यापर्यंत त्यांचे जंगी स्वागत केले, त्याला चार दिवस झाले तरी भाजपकडून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली नसल्यामुळे मतदारसंघात संभ्रमाचे वातावरण आहे. भाजपने सातारच्या उमेदवारीबाबत मौन ठेवल्यामुळे 'चर्चा तर होणारच' अशी परिस्थिती आहे.

- गजानन चेणगे 

सातारच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. परंतु लोकसभेच्या रणांगणात कोणाविरुद्ध कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभेचे सदस्य असले तरी लोकांमधून निवडून येण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून भाजपकडून पहिल्या यादीतच त्यांचे नाव यायला हवे होते अशी शिवप्रेमींची धारणा होती. परंतु भाजपची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी यादी आली तरी त्यात उदयनराजे यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

शब्द दिल्यामुळे स्वागताचे नियोजन

एका बाजूला आपण उदयनराजे यांना सन्मान देत असल्याचे दाखवताना भाजपकडून प्रत्यक्षात विपरित कृती होत असल्याचे दिसते. गेल्या महिन्यात उदयनराजे यांचा वाढदिवस होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीने अभिष्टचिंतन करण्यासाठी जलमंदिरला आले होते. त्यातून आम्ही उदयनराजे यांना किती महत्त्व देतो हे दर्शवण्याचा प्रयत्न होता. पण प्रत्यक्षात उमेदवारीचे कोडे सुटत नसल्याने 'आपण संन्यास घेणार नाही' अशी प्रतिक्रिया देत उदयनराजे यांनी निवडणूक लढणारच असल्याचे संकेत दिले. त्यामुळे भाजपमध्ये त्यांना थोपवण्यासाठी धावपळ सुरू झाली. गिरीश महाजन यांनी सातारला येऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

तरीही उमेदवारीचा निर्णय होत नसल्यामुळे याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मध्यंतरी उदयनराजे यांनी थेट दिल्ली गाठली. पण अमित शहा यांनीही त्यांना वेटिंगवर ठेवले. अखेर त्यांची भेट झाली. या भेटीत त्यांना उमेदवारी संदर्भात शब्द देऊन निश्चिंत राहण्यास सांगितले गेले असावे. त्यामुळे उमेदवारी कन्फर्म झाल्याचे गृहीत धरून उदयनराजे सातारला यायला निघाले. 

दिल्लीची मोहीम फत्ते करून महाराज येत असल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्याच्या सीमेपासून, म्हणजे नीरा नदीपासून साताऱ्यापर्यंत त्यांचे अवाढव्य वाटावे असे जंगी स्वागत केले. पण पक्षीय पातळीवर अळीमिळी गोमचिळी असे वातावरण असून रविवार उजाडला तरी भाजपकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे कुजबुज सुरू झाली आहे. 

महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच

अजित पवार गटाने आधीपासूनच सातारच्या जागेवर दावा सांगितला असून त्यांच्याकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील इच्छुक आहेत. अजित पवार यांनी अद्यापही या जागेवरील दावा सोडलेला नाही. त्याचप्रमाणे युतीमध्ये सातारची जागा शिवसेनेने सातत्याने लढवली असल्यामुळे उमेदवारीसाठी पुरुषोत्तम जाधव हेही प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. परिणामी सातारचा निर्णय लटकला असल्याचे सांगितले जात आहे. 

या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी बाकीचे दोन कितपत सहाय्य करतील याबद्दल शंका व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची, अर्थात भाजपची उमेदवारी आपल्यालाच असल्याचे उदयनराजे यांच्याकडून आत्मविश्वासपूर्वक सांगितले जात आहे. परंतु याबाबत अद्यापही भाजपकडून मौन सोडले जात नसल्यामुळे भाजपबद्दलच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य जनतेतही याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

महायुतीचा निर्णय झाल्याशिवाय 

महाविकास उमेदवार देणार नाही

इकडे महायुतीकडून अद्यापही सस्पेन्स ठेवला असताना, तिकडे महाविकास आघाडीनेही वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. महायुतीकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची रणनीती ठरणार आहे असे दिसते. अर्थातच यामुळे सातारच्या लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. पवार यांनी आपला उमेदवार आधी जाहीर केला तर आपले काम 'सोपे' होईल असा महायुतीचा हिशेब दिसतो. पण समोर शरद पवार आहेत. गेल्या पन्नास वर्षात भल्याभल्यांना अस्मान दाखवलेला हा पैलवान आहे. त्यांचा अंदाज लागणे इतके सोपे नाही हेही लक्षात घेतले पाहिजे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या