प्रतिष्ठेच्या लढतीत होणार कोणाची सरशी... कोणाची दमछाक ?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या राज्यातील पहिल्या दहा मतदारसंघांपैकी माढा हा एक असावा. खुद्द शरद पवार आणि नंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदार संघ गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जिंकला. पण ज्यांच्यामुळे माढा जिंकला, त्यांनाच बेदखल करण्याची पहिली चूक खासदारांनी केली आणि विरोध असतानाही तो बेदखल करून त्याच खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची दुसरी चूक भाजपने केली. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी 'माढा आणि निंबाळकरांना पाडा' हा नारा सुरू झाला आणि दिवसेंदिवस तो बुलंद होत गेला. शेवटी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना माढ्याची लढाई कठीण होऊन बसल्याची कबुली द्यावीच लागली.
- गजानन चेणगे
सन २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी माढ्याच्या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार यांनी भाजपच्या सुभाष देशमुख यांचा ३ लाख १४ हजार ४५९ इतक्या प्रचंड मतांनी दारुण पराभव केला होता. त्यानंतरच्या २०१४ च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला अभेद्य राहिला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी येथून विजय खेचून आणला.
नंतरच्या काळात विरोधकच शिल्लक ठेवायचा नाही (म्हणजे आपल्या पक्षात घ्यायचा) हे सूत्र घेऊन फिरू लागलेला भाजपचा वरवंटा माळशिरसपर्यंत पोहोचला. त्यावेळी मोहिते - पाटील भाजपमध्ये गेले. पण सहकाराचे प्रचंड मोठे जाळे निर्माण करून भागाचा चेहरामोहरा बदलून टाकणारे राज्यातील वजनदार नेतृत्व असूनही अडगळीत पडल्यासारखी त्यांची परिस्थिती झाली. एका बाजूला हक्काचा विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाला असताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते - पाटील घराण्याला डावलले गेले.
उचापतींची फळे आली वाट्याला
भाजपने विधानसभेला माळशिरसमध्ये बाहेरचा उमेदवार आणून बसवला. राम सातपुते त्यांचे नाव. मोहिते - पाटलांच्या ताकदीवर ते निवडून आले, पण हळूहळू त्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. मोहिते - पाटील यांना साईडलाईन करून सातपुते यांच्या माध्यमातून भाजपने या ठिकाणी हातपाय पसरण्यास सुरुवात केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माढ्यात फलटणच्या रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मोहिते - पाटील यांनी या वेळीही राम सातपुते यांच्याप्रमाणे रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य देऊन निवडून आणले. नाईक - निंबाळकर यांच्या विजयात त्यावेळी या लाखाच्या मताधिक्याचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. किंबहुना मोहिते - पाटील यांनी दिलेल्या मताधिक्यामुळेच निंबाळकर लोकसभेत पोहोचले होते. मात्र त्यांनीही पुढे मोहिते - पाटील यांना बेदखल करून त्यांच्याच ईलाख्यात गट बांधण्याच्या उलाढाली केल्या. या ज्या काही उचापती झाल्या, त्याचीच फळे आज उमेदवारांसह भाजपच्याही वाट्याला आली आहेत.
भाजपचे समीकरण बिघडणारे घटक
माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व माण - खटाव हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये फलटण, माढा व करमाळा मतदार संघाचे आमदार अजित पवार गटाचे आहेत. माळशिरस व माण-खटाव मतदार संघाचे आमदार भाजपचे आहेत, तर 'काय झाडी, काय डोंगार' फेम ओक्केमध्ये असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील शिंदे गटाचे आहेत. पण माळशिरसचे आमदार वगळता अन्य आमदारांना विधानसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य नगण्य आहे. आणि माळशिरसमध्ये भाजपच्या राम
सातपुते यांना मिळालेले मताधिक्य ही मोहिते - पाटील यांची ताकद आहे. शिवाय महत्त्वाची बाब अशी, त्यावेळी राम सातपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवून लाखभर मते घेणारे व आत्ताच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात विशेष चर्चेत आलेले उत्तमराव जानकर यावेळी मोहिते - पाटील यांच्यासोबत आहेत. पक्ष फोडणे, त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा अमर्याद वापर यामुळे भाजपविषयी जनतेत मोठा रोष आहे. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांविषयी विलक्षण सहानुभूती आहे. त्यामुळे माढ्याची लढत रंगतदार झाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा जसा एक मोठा वर्ग आहे, त्याचप्रमाणे विजयसिंह मोहिते - पाटील व अजित पवार गटाकडे असलेले रामराजे नाईक - निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर आहेत. लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागल्यापासून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांच्या संभाव्य उमेदवारीला मोहिते - पाटील व रामराजे गटाकडून कडाडून विरोध होत होता. रामराजे यांचे बंधू संजीवराजे हेही माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु भाजपने महायुतीतीलच या विसंवादाकडे ढुंकूनही न पाहता रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांना बेधडक उमेदवारी जाहीर करून टाकली. त्याचे पडसाद माढ्यात उमटले.
लोकांनीच निवडणूक हातात घेतली
माळशिरस आणि फलटणमधून उमेदवाराला कडाडून विरोध होत असताना भाजप उमेदवार बदलेल असे अनेकांना वाटले होते. त्यामुळे माढ्याचा तिढा नको तितका ताणला गेला. राज्यभर या तिढ्याची चर्चा सुरू होती. परंतु विरोधापुढे न झुकण्याची भूमिका भाजपने ठेवली. त्यामुळे माढ्यात तुतारीचा आवाज बुलंद झाला. लोकांनीच येथील निवडणूक हातात घेतली. माळशिरस तसेच फलटणमध्ये 'तुतारी हाती घ्या' असा जोरदार जनरेटा सुरू झाला. यातूनच धैर्यशील मोहिते - पाटील यांची उमेदवारी पुढे आली. भाजपच्या उमेदवाराच्या विरोधातील हा आवाज मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचे पाहून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी माढ्याची लढाई कठीण होऊन बसल्याची जाहीर कबुलीच देऊन टाकली.
माळशिरसप्रमाणेच फलटणमध्ये खासदार रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांना कडवा विरोध होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक - निंबाळकर, फलटणचे माजी नगराध्यक्ष रघुनाथराजे नाईक - निंबाळकर, त्यांच्या भगिनी सुभद्राराजे यांनी उघडपणे संपूर्ण ताकद धैर्यशील मोहिते - पाटील यांच्या पाठीशी उभी केली आहे. शिवरूपराजे खर्डेकर, बाळासाहेब सोळसकर यांची साथ त्यांना मिळत आहे. प्रल्हाद साळुंखे - पाटील, दिलीपसिंह भोसले तसेच भाजपची अल्प ताकद रणजीतसिंह नाईक - निंबाळकर यांच्यासोबत आहे. होम पीच असल्यामुळे फलटणमध्ये ते चांगली लढत देतील. त्यामुळे फलटण विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळेल असे बोलले जाते. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात गतवेळी भाजप आमदार जयकुमार गोरे हेच काठावर पास झाले होते. यावेळी येथे महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे. माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय व बबनराव शिंदे यांच्यावर भाजपची भिस्त आहे. परंतु करमाळ्यात नारायण आबा पाटील आणि माढ्यात माजी आमदार एस. एम. पाटील यांचा गट भाजपला घाम फोडताना दिसत आहे. सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात संपूर्ण जनमत आहे. माळशिरसप्रमाणेच सांगोल्यातून धैर्यशील मोहिते - पाटील यांना चांगले मताधिक्य अपेक्षित आहे.
मतदार संघातील निर्णायक फॅक्टर दुर्लक्षित करण्याची त्याचप्रमाणे विरोधाला न जुमानता उमेदवारी देण्याची चूक भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहे. या सगळ्याचाच परिणाम म्हणजे सुरुवातीपासूनच 'माढा आणि निंबाळकरांना पाडा' हा सुरू झालेला नारा या ठिकाणी टिपेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. येथील निकाल काय लागतो हे पाहणे आता औसुक्याचे आहे.
Mhada Loksabha constituency, Ranjeetsinh Naik Nimbalkar, Dhairyashil Mohite Patil
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

-min.jpg)
0 टिप्पण्या