व्यापार विश्वात मसूरचा लौकिक वाढवणारे उमदे व्यक्तिमत्त्व हरपले
Masur News / गजानन चेणगे
कराड तालुक्यातील मसूरचे प्रसिद्ध व्यापारी - उद्योजक रणजीत केशवलाल तथा बच्चुभाई शहा (वय ८३) यांचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात राजेश, संजय ही दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सुरुवातीच्या काळात शिक्षक म्हणून सेवा केलेल्या बच्चूभाई शहा यांनी शिक्षकी पेशा सोडून व्यापारामध्ये लक्ष घातले. व्यवसायातील सचोटी, बारकावे आत्मसात करत त्यांनी व्यापारात चांगलाच जम बसवला. त्याच्याच जोडीला रणजीत ऑइल मिल्स या उद्योगाचा पाया घालून तो त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्या काळात मसूरसारख्या ठिकाणी ते एक धाडसच होते. ऑइल मिलसाठी भुईमूग शेंग खरेदीकरिता चिपळूण ते पंढरपूर अशा मोठ्या परिघात ते मोठ्या आत्मविश्वासाने वावरत असत. याबाबतीत 1970 ते 2000 अशा तीन दशकांवर त्यांचा ठसा उमटला होता.
व्यापारातील तेजी-मंदीचा अभ्यास
व्यापारातील तेजी-मंदीचा त्याचप्रमाणे वादळ, अतिवृष्टी, अवर्षण अशा देशभरातीलच नव्हे तर जगभरातील गोष्टींचा शेतमालाच्या उत्पादन आणि भावावर कसा प्रभाव पडतो याबाबतीतील त्यांचा अभ्यास वाखाणण्यासारखा होता. एक यशस्वी व्यापारी - उद्योजक म्हणून त्यांनी सर्वत्र मिळवलेल्या नावलौकिकास तोड नाही.
सामाजिक कार्यात उत्साहाने सहभाग
व्यापाराबरोबरच बच्चुबाई शहा हे सामाजिक कार्यातही उत्साहाने सहभागी होत असत. त्यामुळेच ते लायन्स क्लबमध्ये उच्च पदापर्यंत पोहोचले. अभ्यासू, चिंतनशील अशा बच्चूभाईंना वाचनाची विलक्षण आवड होती. प्रत्येकाशी ते अगदी भरभरून बोलत असत. प्रचंड सकारात्मकता आणि प्रचंड इच्छाशक्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील विशेष पैलू होते. या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसत असे. प्रेमळ, विनम्र व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्याविषयी सर्वांनाच आदर वाटे.
अकरा वाजता निघणार अंत्ययात्रा
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मसूर व परिसरात जनतेने हळहळ व्यक्त केली. व्यापार विश्वात मसूरचा लौकिक वाढवणाऱ्या एका उमद्या व्यक्तिमत्त्वास आपण मुकलो आहोत अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. मंगळवारी सकाळी सात वाजता बच्चूभाई शहा यांचे पार्थिव पुण्याहून मसूर येथे आणण्यात येणार असून त्यानंतर अकरा वाजेपर्यंत रणजीत बझार (पंढरपूर रोड) या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अकरा वाजता अंत्ययात्रा निघणार असून त्यानंतर मसूरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या