Satara News : साताऱ्यात अग्नितांडव होता होता टळले


पत्रकारांमधील संवेदनशीलतेचे दर्शन; अनर्थ घडण्यापूर्वीच ओतले पाणी

Satara News : चौथा स्तंभ म्हणून लोकशाही टिकवण्यात योगदान देणारा, सत्यशोधन करून न्यायाच्या बाजूने उभा राहणारा, बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा पत्रकार मनाने किती संवेदनशील व निरागस असतो याचे विलोभनीय दर्शन आज साताऱ्यात झाले. होय, त्याच्या संवेदनशीलतेमुळेच एक महाभयंकर अग्नितांडव होता होता टळले.

त्याचे असे झाले, मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी भवनात एक पत्रकार परिषद होती. त्यासाठी साताऱ्यातील पत्रकार तेथे आले होते. यावेळी त्या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. त्यांच्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा लावल्या होत्या. राष्ट्रवादी भवनाच्या समोरच्या बाजूला म्हणजेच पोलीस कवायत मैदानाच्या कुंपण भिंतीच्या पूर्वेकडील बाजूसही चार चाकी व दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात लावलेली दिसत होती. 

... तर मोठा अनर्थ घडला असता

पत्रकार परिषद संपल्यानंतर कार्यालयाच्या आवारात सावलीत काही पत्रकार थांबले होते. वेळ भर दुपारची. सूर्यदेव आग ओकत असल्याने परिसर भाजून निघालेला. उन्हाच्या चटक्यांनी प्रत्येक जीव कासावीस झालेला. समोर रस्त्याकडेला लावलेल्या वाहनांच्या जवळच पडलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतलेला. काही क्षणातच ही आग एका कारच्या चाकाला भिडली असती. मोठा अनर्थ घडला असता. एका गाडीने पेट घेतल्यानंतर आगीचा वनवा आणखी पसरला असता. पण त्याचवेळी ही गंभीर बाब सातारा लोकमतमधील पत्रकार नितीन काळेल यांच्या लक्षात आली. 

आग विझवण्यासाठी धडपड 

इतक्या सगळ्या गर्दीत केवळ बघ्याची भूमिका न घेता हे भयानक अग्नितांडव घडू नये म्हणून त्यांची तगमग सुरू झालेली दिसली. आग विझवण्यासाठी पाणी कुठून आणायचे याचा शोध घेत ते राष्ट्रवादी भवनात गेले. तेथील पिण्याच्या पाण्याचा जार त्यांनी उचलून आणला. धावत पळत जाऊन रस्ता ओलांडत त्यांनी ती आग आणखी भडकण्यापूर्वीच विझवली. बऱ्यापैकी धोका टळला होता, परंतु अजूनही पालापाचोळा धुमसत होता. त्यामुळे पुन्हा कार्यालयात जाऊन काळेल यांनी एक बादली भरून आणली आणि संपूर्ण आग विझवली. 

सॅल्युटच केला पाहिजे अशी कृती 

आपल्याला काय करायचंय म्हणून दुर्लक्ष करून पुढे जाण्याची प्रवृत्ती बऱ्याचदा पहायला मिळते. पण नितीन काळेल यांनी तसे केले नाही. म्हणूनच काळेल यांची ही संवेदनशीलता, समयसूचकता, प्रसंगावधान आणि प्रत्यक्ष कृती याला सॅल्युटच केला पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या वेदना विसरून कर्तव्याला महत्त्व देणारे पत्रकार हे किती निरागस व संवेदनशील असतात याचे अनोखे दर्शन या निमित्ताने सातारकरांना घडले.

Satara Journalist, Human Interest Story

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या