Satara News : 'हिरवाई' संवर्धनासाठी निर्धाराची गरज


मृणालिनी निगडे व डॉ. चित्रा दाभोलकर यांना हिरवाई पुरस्कार प्रदान

Satara News : पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट वाढू लागले आहे. अशा संकटाला तोंड देण्यासाठी हिरवाईसारख्या प्रकल्पाची गरज आहे. असे प्रकल्प टिकविण्यासाठी समाजातील धुरिणांनी पुढे येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार करायला हवा, असे आवाहन सातारा येथील हिरवाई प्रकल्पात रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी केले.

सातारा येथील सदर बझारमधील हिरवाई संस्थेच्यावतीने पांडुरंग चौगुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा १३ वा हिरवाई पुरस्कार मृणालिनी मनीष निगडे यांना व १४ वा हिरवाई पुरस्कार साताऱ्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. चित्रा दाभोलकर यांना ज्येष्ठ विचारवंत, शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. सोमनाथ साबळे, नौदलातील कॅप्टन शिवाजी यादव, संस्थेच्या अध्यक्ष प्रा. संध्या चौगुले, विश्‍वस्त डॉ. सुनील यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सर्व प्रमुख वक्त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्याची गरज व्यक्त केली. 

चांगल्या कामाला पाठबळ मिळते

समाजासाठी विविध क्षेत्रांत अतिशय महत्त्वाचे काम करणाऱ्या व्यक्ती वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, हीच या कार्याला मिळालेली पावती आहे, असे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले. 

हे काम संघर्षातून उभे राहिले आहेच, पण त्याचबरोबर पांडुरंग चौगुले व संध्या चौगुले यांनी समन्वयातून आणि विविध स्तरातील लोकांचा सहभाग घेऊन उभे केले आहे. या कामाबद्दल डाव्या विचारांकडून आणि उजव्या विचारांकडूनही प्रोत्साहन मिळाले याचा अर्थ कोणत्याही विचाराकडून चांगल्या कामाला पाठबळ मिळते, असे मत डॉ. दाभोळकर यांनी व्यक्त केले.

पृथ्वीवर नंदनवन उभे राहील

झाडांची भिशी, पाण्याची भिशी अशा उपक्रमांमधून गृहिणीसुद्धा घरबसल्या सामाजिक काम करु शकते. इंटरनेटद्वारे विविध संस्थांची माहिती घेऊन स्वतः ज्ञान मिळवून निसर्ग, पर्यावरणासाठी सामाजिक काम करता येते, निसर्गाविषयी आस्था असणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्यास चांगले फळ मिळू शकते, असे मृणालिनी निगडे यावेळी म्हणाल्या. दलाई लामा यांच्या वृक्षचळवळीत सर्वानी सहभाग घेतला तर या पृथ्वीवर स्वर्गीय नंदनवन उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

संध्या चौगुले यांच्या सातत्य आणि चिकाटीमुळे कठीण परिस्थितीतून हे काम उभे राहिले, असे सांगून डॉ. चित्रा दाभोलकर म्हणाल्या, झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आणि ते काम टिकवण्याचे आव्हान पेलणाऱ्या संध्या चौगुले यांची चिकाटी माझ्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या या उपक्रमात तसेच कातकरी समाजासाठी चालणाऱ्या उपक्रमात माझा सहभाग त्यामुळेच राहिला. असे चिकाटीचे प्रयत्न समोर असल्यामुळेच मीही माझ्या कार्यात झोकून देऊन काम केले. त्यामुळे आजचा हा पुरस्कार मिळत आहे. 

पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्नांची गरज 

हिरवाईच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असताना पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज स्पष्ट झाल्याचे डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले. हिरवाई प्रकल्प संवर्धनासाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

हिरवाई म्हणजे ध्रुवतारा आणि संध्या चौगुले म्हणजे तारकांचा पुंजका आहे. या पुंजक्यांच्या मदतीतून हिरवाई निर्माण झाली. ती हिरवाई  ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ रहावी, अशी अपेक्षा शिवाजी यादव यांनी व्यक्त केली. नौदलातील काही अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर हम होंगे कामयाब हे गीत सादर करत हिरवाई प्रकल्पाच्या ध्येयपूर्तीच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. दुर्गळवाडीचे सरपंच महिपती यादव यांनी संध्या चौगुले यांच्यामुळे आमचे गाव हागणदारीमुक्त झाल्याची माहिती दिली. स्वाती राऊत यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी म्हस्के यांनी आभार मानले. यावेळी डॉ, संदीप श्रोत्री, डॉ. अनिमिष चव्हाण, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. अच्युत गोडबोले, प्रा. धनंजय देवी, विजया शेटे, बीना शहा, सारिका शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या