यशवंत विचारांचा दुवा निखळला; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Satara News : सातारा तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव जगदेवराव चव्हाण (वय ८०) यांचे शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झाले. आज कामथी तर्फ सातारा येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा संदीप, दोन विवाहित मुली, दोन बंधू, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सातारा तालुक्यातील कामथी तर्फ सातारा येथे ४ एप्रिल १९४४ रोजी जन्मलेल्या प्रल्हादभाऊंनी पदवीधर झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ स्वामी विवेकानंद आणि रयत शिक्षण संस्थेत अध्यापन केले. यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्या राष्ट्रीय विचारधारेच्या आणि संस्थात्मक - रचनात्मक राजकारणाने प्रेरित होऊन त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. अंगभूत संघटन कौशल्यामुळे त्यांनी पक्षाच्या तालुका आणि पुढे जिल्हा स्तरावर पदाधिकारी म्हणून काम पाहिले.
विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी लढा
सातारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत ते सदस्य झाले. १९८४ च्या सुमारास ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती होते. याखेरीज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध संघ, तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा खरेदी विक्री संघ आदी संस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम पाहिले. परिसरात उभ्या राहिलेल्या कण्हेर धरणामुळे विस्थापित झालेल्यांसाठी धरणग्रस्त कृती समिती स्थापन करून त्यांनी पुनर्वसनासाठी लढा दिला.
पक्ष संघटनेचे प्रभावी काम
यशवंतराव चव्हाण, किसन वीर या नेत्यांनंतर त्यांनी प्रतापराव भोसले, विलासराव पाटील - उंडाळकर, लक्ष्मणराव पाटील आदींच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेचे काम पाहिले. सातारा तालुक्याने बाबुराव घोरपडे, जिजाबा अण्णा जाधव, डी. बी. कदम, किसनराव साबळे (पाटील), बबनराव बडदरे, भीमराव घोरपडे आदींसारखे नेते दिले. याच मालिकेतील प्रल्हादराव चव्हाण होत. त्यांच्या विधायक कार्याचा वारसा त्यांचे चिरंजीव संदीप चालवत असून ते सातारा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत.
अंत्यसंस्कारप्रसंगी दिग्गजांची उपस्थिती
दरम्यान, आज सकाळी अकराच्या सुमारास दिवंगत चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, माजी आमदार मदन भोसले, सदाभाऊ सपकाळ, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील - उंडाळकर, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, बाळासाहेब वीर, उपराकार लक्ष्मण माने आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रल्हादराव चव्हाण यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
Satara District Congress, Udayanraje Bhosle, Shivendraraje Bhosle, Shashikant Shinde
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या