महायुतीच्या उमेदवारीबद्दलचा संभ्रम संपुष्टात; गुरुवारी अर्ज भरणार
Satara News : अखेर भाजपने आज आपल्या बाराव्या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीची घोषणा केली. या घोषणेमुळे यासाठी अधीर झालेल्या उदयनराजे समर्थकांचे चेहरे उजळले असून महायुतीच्या उमेदवारी संदर्भातील संभ्रम संपुष्टात आला आहे. आता गुरुवारी (दि. १८) उदयनराजे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मुळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सातारच्या जागेवर दावा सांगितला होता. त्यांच्याकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील यांची निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू होती. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हे देखील शिंदे गटाला जागा मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. त्यांच्यात ही रस्सीखेच सुरू असतानाच सध्या राज्यसभेवर असलेले भाजपचे खासदार उदयनराजे यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच निवडणूक लढवायचीच या इराद्याने तयारी चालवली होती. परंतु जागा नक्की कोणाच्या वाट्याला यावरून सातारच्या जागेबाबत गुंता वाढला होता.
घोषणा लांबल्याने वाढला संभ्रम
त्याचवेळी उदयनराजे यांचे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. भाजपकडून प्रतिसाद येत नसल्याचे पाहून त्यांनी 'आपण संन्यास घेणार नाही' असे सांगत निवडणूक लढवणार असल्याचा इरादा जाहीर केला. त्यामुळे भाजपमध्ये चांगलीच धावाधाव सुरू झाली. गिरीश महाजन यांनी तातडीने सातारा गाठून उदयनराजे यांच्याशी गोड गोड बोलून साखरपेरणी करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न झाला.
परंतु तरीही प्रत्यक्षात उमेदवारीचा फैसला होत नसल्यामुळे उदयनराजे यांनी दिल्ली गाठली. पण अमित शहा यांनीही त्यांना तीन दिवस भेट दिली नाही. त्यानंतर भेट झाली आणि उदयनराजे सातारला आले. त्यावेळी त्यांची उमेदवारी फिक्स झाल्याचे गृहीत धरून त्यांचे जंगी स्वागत केले गेले. पण त्यानंतरही पंधरा दिवस उलटून गेले तरी आणि भाजपच्या उमेदवारांच्या याद्यांमागून याद्या येत असतानाही त्यात उदयनराजे यांचे नाव येत नसल्याने उदयनराजे समर्थकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. त्याचबरोबर हा सातारच्या गादीचा अवमान असल्याची चर्चादेखील सुरू झाली होती.
इच्छाशक्ती कामी आली
सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात विराट शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जणू भाजपला जाग आली आणि अखेर आज बाराव्या यादीत सातारचे उमेदवार म्हणून उदयनराजे यांच्या नावाची घोषणा झाली. उदयनराजे यांची इच्छाशक्ती कामी आली. या घोषणेमुळे उमेदवारीसाठी अधीर झालेल्या उदयनराजे समर्थकांनी निश्वास सोडला असून महायुतीचा उमेदवार कोण याबाबतीतील मतदारांमधील संभ्रम संपुष्टात आला आहे. आता गुरुवारी उदयनराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
BJP Declared Satara Candidate, Satara Constituency, Udayanraje Bhosale, BJP Leader Amit Shah
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या