... तर आम्हाला गृहीत धरू नका; वेळ पडल्यास फॉर्मही भरू - अशोक गायकवाड
Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा घोळ मिटला नसतानाच रिपब्लिकन पक्षाचा सन्मान राखला जात नसल्याच्या कारणावरून महायुतीत तणातणी सुरू झाली आहे. सन्मान राखला जात नसेल, तर आम्हाला गृहीत धरू नका, वेळ पडल्यास निवडणुकीचा फॉर्मही भरू, असा निर्वाणीचा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.
सातारा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांनी गाठीभेटींचा धडाका सुरू केला असला तरी भाजपकडून त्यांची उमेदवारी जाहीर केली गेलेली नाही. त्यामुळे सातारच्या जागेवर दावा सांगणाऱ्या अजित पवार गट व शिंदे गट यांना अद्यापही जागा मिळण्याची आशा आहे. या घडामोडींमुळे आधीच भाजपसह महायुतीत कमालीची अस्वस्थता असताना आता आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची नाराजी समोर आली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तणातणी वाढली आहे.
भाजपबद्दल तीव्र नाराजी
आज आठवले गटाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साताऱ्यात बैठक झाली. त्यामध्ये भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या बैठकीदरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपबद्दलची नाराजी तीव्र शब्दात व्यक्त केली. याप्रसंगी आप्पा तुपे, अण्णा वायदंडे, संपत कांबळे, आप्पासाहेब गायकवाड, एकनाथ रोकडे, प्राणलाल माने, उत्तम कांबळे, अजित गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तर उद्या आम्ही सुधारण्याची अपेक्षा ठेवू नका !
उमेदवार निश्चित झाला नसला तरी मेळावे सुरू झाले आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष कुठे आहे ते शोधूनही सापडत नाही. त्या मेळाव्यांमधील पोस्टरवर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे छायाचित्र लावण्याबाबत प्रोटोकॉल पाळला जात नाही. ज्यांनी महायुतीला जन्म दिला तो जन्मदाताच पोस्टरवरून गायब होत आहे. त्यांचा सन्मान राखला जात नसल्याने रिपब्लिकन कार्यकर्ता मनस्तापाने पेटून उठला आहे. आम्ही निवडून येऊ शकत नाही हे आम्हाला माहित आहे, मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही हे लक्षात ठेवा. आज जर तुम्ही सुधारला नाहीत, तर उद्या आम्ही सुधारण्याची अपेक्षा ठेवू नका, असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत.
महायुती दलित समाजाला कुठेतरी न्याय देईल अशी अपेक्षा होती. पण काय मिळाले याचे उत्तर मिळत नाही. आम्हाला सन्मान न देता, या आणि मेळाव्याला बसा अशीच तुमची भूमिका असेल तर आम्हाला गृहीत धरू नका असे त्यांनी बजावले. रामदास आठवले मंत्रीपदावर असल्यामुळे त्यांना मर्यादा येतात, पण दुसऱ्या फळीतला कार्यकर्ता बोलू लागला आहे असे ते म्हणाले.
भाजप आम्हाला उबदारीच येऊ देत नाही !
ज्याप्रमाणे मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढू शकत नाही, त्याप्रमाणे भाजप आमच्या पक्षाला उबदारीच येऊ देत नाही, असा थेट हल्लाबोल अशोक गायकवाड यांनी याप्रसंगी भाजपवर केला. पण आम्ही हे सहन करणार नाही. वेळ पडल्यास वेगळा विचार करू, प्रसंगी निवडणुकीला अर्जही भरू असा निर्वाणीचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.
Republican party of India, Ramdas Athavale, Bhartiya Janata party Maharashtra state, Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या