उदयनराजे यांच्यासह भाजपची प्रतिष्ठा पणाला; लढतीकडे राज्याचे लक्ष
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता सातारच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अन्य काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी येथील खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यातच होणार आहे. सातारचा गड भाजपसाठी आजवर अभेद्य असल्यामुळे उदयनराजे यांच्यासह भाजपने सातारची लढत प्रतिष्ठेची केली आहे. तरीपण एकजिनसी महाविकास आघाडीपुढे घटक पक्षांची एकजूट उभी करण्याचे आव्हान महायुतीपुढे असणार आहे. त्यामुळे राज्यातील लक्ष्यवेधी लढतींपैकी ही एक असणार आहे.
- गजानन चेणगे
सातारा मतदारसंघातून २००९ पासून उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रतिनिधित्व करत होते. विशेषतः २००९ व नंतरच्या २०१४ च्या मोदी लाटेतील निवडणुकीतही चढत्या क्रमाने मताधिक्य घेत ते विजयी झाले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमालीचे घटले. पण त्याबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. उलट निवडून आल्यानंतर तीन-चार महिन्यातच त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात त्यासाठी भाजपकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. उदयनराजे यांनी भाजपमध्ये यावे यासाठी भाजपने टाकलेल्या मोहजालात उदयनराजे त्यावेळी कसे अडकले हेच एक मोठे कोडे आहे. पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणून केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी चर्चा त्यावेळी सुरू होती.
पोटनिवडणुकीत भाजपचा अपेक्षाभंग
छत्रपती शिवाजी महाराजांचे घराणेदेखील भाजपसोबत आले असल्याचा डांगोरा पिटून त्याचा राजकीय लाभ भाजपला घ्यायचा होता आणि दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस - राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला हानी पोहोचवायची होती. त्यासाठीच त्यांनी उदयनराजे यांना गळ टाकला होता. उदयनराजे त्या गळाला लागले आणि त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या कृतीबद्दल मतदारसंघात नकारात्मक भावनेचे बीज रोवले गेले. त्याचा फटका त्यांना पोटनिवडणुकीत बसला. राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून त्यांचा सपशेल पराभव झाला. सदासर्वकाळ आम्हाला गृहीत धरू नका असा संदेशच मतदारांनी या निकालातून दिला. भाजपसाठी हा मोठा अपेक्षाभंग होता.
पायघड्या घालणाऱ्यांनी ताटकळत ठेवले !
या पराभवानंतर काही काळाने भाजपने उदयनराजे यांना राज्यसभेवर घेतले खरे, मात्र आजअखेर त्यांना केंद्रीय मंत्रिपद काही मिळाले नाही. त्या पराभवाची सल उदयनराजे यांना होती. त्यामुळे लोकांमधून पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभेची तयारी केली होती. मात्र आधी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आतुर झालेल्या आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालणाऱ्या भाजपकडून शेवटपर्यंत त्यांना उमेदवारीसाठी ताटकळत ठेवले गेले. राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करणाऱ्या भाजपकडून पहिल्या - दुसऱ्या यादीतच उमेदवारी जाहीर करून त्यांचा सन्मान राखला जाईल असा उदयनराजे समर्थकांचा कयास आणि विश्वास होता. मात्र भाजपने या विश्वासाला तडा दिल्याने उदयनराजे समर्थकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत होत्या.
अखेर १२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १६ एप्रिलला भाजपकडून उदयनराजे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यानंतरच खऱ्या अर्थाने येथील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून दोन्ही बाजूंनी गाठीभेटी, पदयात्रा, सभा यांचा धडाका सुरू झाला आहे. प्रत्यक्ष मैदानावरील प्रचाराबरोबरच समाज माध्यमांवरूनही वार - प्रतिवार सुरू झाले आहेत.
सर्वकाही आलबेल आहे असे नाही
एकीकडे महाविकास आघाडीकडून एकदिलाने प्रचार मोहीम राबवली जात असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, मावळते खासदार श्रीनिवास पाटील, ॲड. उदयसिंह पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते नितीन बानुगडे - पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हर्षद कदम उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे महायुतीत सर्वकाही आलबेल आहे असे नाही.
पाटण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षाच्या गोटातून समाज माध्यमावर व्हायरल झालेली पोस्ट हे याचे एक बोलके उदाहरण आहे. अजितदादा गटाचे वाईचे आमदार मकरंद पाटील हे सातारची जागा अजित पवार गटाला मिळावी यासाठी आग्रही होते. त्यांचे बंधू व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील लोकसभेसाठी इच्छुक होते. राष्ट्रवादीची ही जागा भाजपने बळकावल्याची सल नाही म्हटले तरी अजित पवार गटात आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हेदेखील निवडणूक लढवण्यावर ठाम होते. भाजपने ही जागा घेतल्यामुळे या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला नसेल तरच नवल. खुद्द सातारा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भूमिका पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची आहे. पण त्यांच्याच काही निष्ठावंतांनी उदयनराजे यांच्याविषयी स्पष्ट शब्दात आपली नाराजी दर्शवली आहे. आता हे सर्व घटक निवडणुकीत किती ताकदीने काम करतात यावर येथील सर्व गणित अवलंबून आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागे केंद्रातील व राज्यातील सत्तेचे बळ, त्यांचे ग्लॅमर, सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार, प्रचंड साधनसामग्री या बाजूने भक्कमपणा दिसत असला तरी भाजपने अखेरपर्यंत उमेदवारीसाठी ताटकळत ठेवल्यामुळे मतदारांमध्ये गेलेला चुकीचा संदेश पुसून काढणे कितपत शक्य होणार हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती जाणवत आहे. जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे. आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांचा हा बालेकिल्ला असल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील येथील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे हे मात्र निश्चित.
Satara Loksabha constituency, BJP candidate Udayanraje Bhosale, NCP Sharadchandra Pawar, Prithviraj Chavan, MP Srinivas Patil
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या