यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर यांचा सच्चा पाईक हरपला
Satara News : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव बाबुराव भोसले यांचे आज सकाळी भुईंज (ता. वाई) येथे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकारणाबरोबरच कृषी, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणारा यशवंत विचारांचा, काँग्रेसचा सच्चा पाईक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रतापराव भोसले तथा भाऊ यांना वयोमानाप्रमाणे गेल्या काही दिवसात प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात झालेल्या सातारा लोकसभेच्या निवडणुकीत ८५ वर्षांपुढील ज्येष्ठांसाठी निवडणूक आयोगाने गृहभेटीतून मतदानाच्या केलेल्या व्यवस्थेतून त्यांनी आपल्या घरीच मतदानाचा हक्क बजावला होता. मध्यंतरी त्यांना उपचारार्थ पुण्याला हलवले होते. तिथून चार-पाच दिवसांपूर्वी त्यांना भुईंजला घरी आणले होते. आज सकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले आणि वाई तालुक्यातील काँग्रेससह सर्वपक्षीय पदाधिकारी नेतेमंडळींची अंत्यदर्शनासाठी रीघ लागली. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.
सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न नेतृत्व
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर यांच्या सहवासात प्रतापराव भाऊ यांची राजकीय कारकीर्द बहरली. १९६७ पासून १९८५ पर्यंत सलग चार वेळा ते वाई - खंडाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. या काळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही आपला ठसा उमटवला होता. १९८४ मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांच्या सातारच्या जागेवरून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. १९८४, १९८९ व १९९१ अशा तीन लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नंतर राज्यातील युती शासनाच्या काळात १९९७ पासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. त्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणण्यात त्यांचे परिश्रम मोलाचे होते. अत्यंत सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक असणारे आणि स्वाभिमान जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
आज सायंकाळी अंत्यसंस्कार
आज सायंकाळी चार वाजता भुईंज येथील त्यांच्या घरापासून प्रतापराव भाऊ यांची अंत्ययात्रा निघणार असून देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Congress Leader Prataprao Bhosale, Yashvantrao Chavan Kisan Veer
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या