Satara News : ...तेव्हा सरकार बघते - रामराजे


सरकारचे कामकाज चालते तरी कसे यावरच ठेवले नेमके बोट 

Satara News : प्रत्येक गोष्ट सरकार बघेल असे लोकांना वाटते, पण तसे नसते. अहो, सरकारला बघायला लावावे लागते, तेव्हा सरकार बघते अशी टोलेबाजी करत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांनी आज येथे सरकारी कार्यपद्धतीवरच नेमके बोट ठेवले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात 'बदलत्या हवामान परिस्थितीत पर्यावरणपूरक खोडवा उसाच्या शाश्वत व विक्रमी उत्पादनासाठी कुशल प्रशिक्षक निर्मिती कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात रामराजे बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, सुनील खत्री, सुरेश सावंत, मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब ढाणे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. सुनील मासाळकर, श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकप्रतिनिधींनाच माहिती नाही

जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम केवळ उसावरच नव्हे, तर सर्वच पिकांवर जाणवतात. मात्र या गंभीर समस्येविषयी लोकप्रतिनिधींनाच माहिती नाही अशी स्थिती आहे. अज्ञान हाच मोठा विषय आहे. आणि 'सरकार बघेल' असे लोकांना वाटते, हे सांगताना रामराजे यांनी उपरोक्त टिप्पणी केली.

इथे मान्सूनला थोडा उशीर झाला तरी ऊस सुकायला लागतो. जिथे एकरी ६०-७० टन ऊस निघाला पाहिजे, तिथे सरासरी ३४ टन निघत असेल तर उसावर किती अवलंबून राहायचे याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी हवामान बदलाच्या परिणामाला सामोरे जाणारा, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपले जीवन संपन्न व वैभवशाली करू शकणारा शेतकरी तयार झाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेऊन ही कार्यशाळा आयोजित केली आहे. यात जे ज्ञान मिळेल, त्यावर केवळ हॉलमध्ये चर्चा करून चालणार नाही, तर हे ज्ञान शेताच्या बांधापर्यंत नेले पाहिजे अशी अपेक्षा रामराजे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

जिल्हा बँकेने केले सेतूचे काम

ऊस हे अतिशय काटक पीक असून ते किडीला चांगला प्रतिकार करते. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून त्यावर याची वाढ होते व अतिरिक्त कार्बन तो जंगली झाडांप्रमाणे मुळावाटे जमिनीत पोहोचवण्याचे काम करतो. या दृष्टीने उसाच्या एकरी उत्पादन वाढीकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठीचे तंत्रज्ञान देणारे विद्यापीठ व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यामध्ये सेतूचे काम सातारा जिल्हा बँक करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे, असे उद्गार कर्नल डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी याप्रसंगी काढले. साखर कारखान्यांनीही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांचेही समयोचित भाषण झाले.

डॉ. सरकाळे यांनी मांडली भूमिका 

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विशद करून शेतकरी हितासाठी बँक राबवत असलेल्या योजनांविषयी माहिती दिली. प्रारंभी मृदा शास्त्रज्ञ महिपतराव जाधव यांना आदरांजली वाहण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आभार मानले.

Ramraje Naik Nimbalkar, Satara District Central cooperative Bank, Mahatma Phule agricultural University

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या