कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी जागवत सातारकर वाहणार श्रद्धांजली
Satara News : ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री, माजी खासदार प्रतापराव भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी (दि. २९) सायंकाळी पाच वाजता जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा होणार आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की प्रतापराव भोसले यांचे भुईंज येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून त्यांनी अभिमान वाटेल अशीच कामगिरी केली. कार्यकर्ता ते नेता हा त्यांचा सुमारे ६० वर्षांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास हा थक्क करणारा आहे.
आमदार, मंत्री म्हणून प्रभावी काम
वयाच्या २७ व्या वर्षी भुईंजच्या सरपंचपदापासून त्यांची सार्वजनिक जीवनातील कारकीर्द सुरू झाली. सरपंच पदावरून ते थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. सलग चार वेळा त्यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून प्रभावी काम पाहिले. याच दरम्यान शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील साकारलेल्या पुलोद सरकारच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. याच मंत्रिमंडळात ते ग्रामीण विकास खात्याचे राज्यमंत्री झाले. पुढील काळात वसंतदादा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते याच खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले.
यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर सातारा लोकसभेच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी सातारा मतदारसंघाचे सलग तीन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले. यादरम्यानच्या काळात सातारा जिल्ह्यातील धोम धरण, कण्हेर धरण या खेरीज किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना जनता शिक्षण संस्था आदी संस्थांच्या उभारणीत आणि वाटचालीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. लोकसभा प्रतिनिधी काळात त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदारांचे संघटन करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात पुढाकार घेतला.
काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणले
शतकाची परंपरा लाभलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पुन्हा काँग्रेसला महाराष्ट्राच्या सत्तेत आणले. याच काळात ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदारही ठरले. त्यानंतर मात्र पुढील काळात ते राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले.
सातारा जिल्ह्याला नेतृत्वाची अभिमानास्पद अशी परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई यांच्या मालिकेत प्रतापराव भोसले यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागेल. त्यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त होण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेला सर्व पक्षाच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Yashvantrao Chavan, Kisan Veer, Former Maharashtra state Congress President Prataprao Bhosale
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या