बेदरकार डंपर चालकाने घेतला जीव; लिंब खिंडीजवळ दुर्घटना
Satara News : महामार्गाकडील सेवा रस्त्यावरही भरधाव वेगात निघालेल्या डंपरने मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा तालुक्यातील लिंब गावचे प्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र रघुनाथ उर्फ बाबू खादगे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी कल्पना रामचंद्र खादगे गंभीर जखमी झाल्या. आज सकाळी दहाच्या सुमारास लिंब खिंडीजवळ ही दुर्घटना घडली.
बाबू खादगे हे मोटरसायकलवरून पत्नीसमवेत सकाळी लिंबहून सातारला यायला निघाले होते. नागेवाडी फाट्याकडून सेवा रस्त्याने येत असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली व अपघात होऊनही डंपर तसाच बेदरकारपणे निघून गेला. ही धडक इतकी भीषण होती की त्यात मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत डोक्याला गंभीर इजा पोहोचून बाबू खादगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी कल्पना या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डंपर चालकांच्या मुजोरपणा
या अपघातामुळे डंपर चालकांच्या मुजोरपणाचा व बेदरकारपणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लिंब खिंड परिसरात क्रशरचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या जीवावर तेथे काम करणाऱ्या डंपर चालकांची मुजोरी चालते. सेवा रस्त्यावरूनही हे डंपर प्रचंड वेगाने धावत लोकांसाठी कर्दनकाळ बनतात. या परिसरात सेवा रस्त्यावरच वर्षाला किमान दहा ते पंधरा अपघात होत असतात. त्यात अनेकांनी जीव गमावले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये डंपर चालकांविषयी प्रचंड संताप आहे.
... तर मृतदेह ताब्यात घेणार नाही
याच पार्श्वभूमीवर अपघात करून पळून गेलेल्या डंपर चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा खादगे यांचे नातेवाईक व लिंब ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच लिंब गावावर शोककळा पसरली असून तालुका बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या