Satara Story : प्रतापराव भोसले : चारित्र्यसंपन्न नेतृत्व


महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तेवत राहिलेला नंदादीप

जुन्या काळातील काँग्रेसचे धडाडीचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले तथा भाऊ यांचे रविवारी (दि. १९ मे २०२४) सकाळी वाई तालुक्यातील भुईंज या त्यांच्या गावी निधन झाले. ९० वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. १९६० पासूनची तब्बल पाच - सहा दशके महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तेवत राहिलेला हा नंदादीप अखेर निमाला. त्यामुळे त्यांची झंझावाती कारकीर्द ज्यांनी जवळून पाहिली असेल त्यांना गहिवरून येणे स्वाभाविक आहे. 

- गजानन चेणगे

 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि देशभक्त किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या मुशीत राजकीय जडणघडण झालेल्या प्रतापराव भाऊ यांची एक सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न, विचारांची पक्की बैठक असलेला नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख होती. भारदस्त, उंचपुरे, देखणे व्यक्तिमत्व, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व याची देणगी त्यांना लाभली होती. 

सरपंच पदापासून श्रीगणेशा

२५ ऑक्टोबर १९३४ रोजी भुईंज येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रतापराव भोसले यांनी वयाच्या तिशीतच आपल्यातील राजकीय परिपक्वतेची चुणूक दाखवून दिली होती. सामाजिक बांधिलकीची जाण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली तळमळ, त्याला लढाऊ बाण्याची मिळालेली जोड यामुळे अल्पवयातच ते भुईंजचे सरपंच झाले. भुईंज हे वाई तालुक्यातील विशेषतः महामार्गावरील बाजारपेठेचे मोठे गाव म्हणून सर्वांना परिचित असल्याने अर्थातच त्या गावचे सरपंचपद मिळवणारे प्रतापराव भाऊ त्याकाळी युवक वर्गात चांगलेच चर्चेत आले. साहजिकच काँग्रेसने त्यांना १९६७ साली म्हणजे वयाच्या ३३ व्या वर्षी वाई - खंडाळा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. तत्पूर्वी तब्बल चार टर्म आमदार राहिलेल्या दादासाहेब खाशेराव जगताप यांचा त्यांनी पराभव केला. पुढच्या सलग चार टर्म प्रतापराव भाऊ हेच वाई - खंडाळ्याचे आमदार होते.

पुलोद प्रयोगात पवारांना साथ

महाराष्ट्राचे थोर नेते शरद पवार यांनी १९७८ मध्ये जो पुलोद आघाडीचा ऐतिहासिक प्रयोग केला, त्यामध्ये पवारांसोबत खंबीरपणे आघाडीवर राहिलेल्यांमध्ये प्रतापराव भाऊ हे एक होते. त्या पुलोद सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यानंतर १९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदी त्यांची वर्णी लागली. ग्रामीण विकास मंत्री म्हणून ते राज्याचा गावगाडा चालवू लागले. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतापराव भोसले या नावाला एक मोठे वलय प्राप्त झाले. 

यशवंतरावजींच्या मतदारसंघाचे वारसदार

यादरम्यान यशवंतराव चव्हाण लोकसभेत सातारा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावेळी प्रतापराव भोसले यांचा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला होता. दुर्दैवाने याच दरम्यान चव्हाण साहेबांचे देहावसान झाले. त्यामुळे डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले प्रतापराव भाऊ त्या निवडणुकीत काँग्रेसचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार झाले. सातारा मतदारसंघाचे यशवंतरावजींचे वारसदार या नात्याने १९८४, १९८९ व १९९१ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये प्रतापराव भाऊ खासदार म्हणून निवडून आले.

मुख्यमंत्री व्हायला हवे होते

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील काँग्रेसची सत्ता गेली आणि युतीचे सरकार आले. कधी नव्हे तो काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचे शल्य धुवून काढण्यासाठी १९९७ मध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा एक आश्वासक चेहरा म्हणून प्रतापराव भाऊ यांच्याकडे सोपवली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाऊंनी पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत पक्षाचा हा विश्वास सार्थ ठरवला. राज्यात काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला. ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्ष जिंकतो त्यांना मुख्यमंत्री करण्याचा एक अलिखित संकेत गृहित धरला तर प्रतापराव भोसले १९९९ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायला हवे होते. परंतु त्याप्रमाणे घडले नाही हे खरे. 

प्रतापराव भाऊ यांचे राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, कृषी, सहकार अशा विविध क्षेत्रात अनमोल असे योगदान राहिले आहे. कृषी औद्योगिक समाज रचनेचा यशवंतरावांचा विचार पुढे नेण्यासाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्यांना शिक्षणाच्या सुविधा देण्यापासून कामगारांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव हा ध्यास घेऊन त्यांनी आपली हयात खर्ची घातली. 

असा प्रेम - जिव्हाळा दुर्मिळ 

भाऊ स्वतः काँग्रेसचे मोठे नेते असूनदेखील शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविषयी त्यांना विलक्षण ममत्व होते. या गोष्टीचे अनेकांना अप्रूप वाटे. संजय राऊत हे मला माझ्या मुलाइतकेच प्रिय आहेत हे ते आवर्जून सांगत. त्यांच्यातील या अतूट नात्यामुळेच मागे एकदा संजय राऊत यांनी भुईंजला किसन वीर साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली होती. असा प्रेम जिव्हाळा जपणारे लोक राजकारणात अपवादाने पाहायला मिळतात. भाऊंच्या व्यक्तिमत्व आणि कर्तबदारीचे स्मरण चिरंतन राहील.

Yashvantrao Chavan, Kisan Veer, Former Maharashtra state Congress President Prataprao Bhosale, Sharadchandra Pawar, Sanjay Raut

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या