Wildlife News : 'सह्याद्री व्याघ्र'मधील गावे हलवा


मानव - वन्यजीव संघर्षाकडे वेधले लक्ष; अन्यथा १० जूनपासून उपोषण

Wildlife News : सह्याद्री व्याघ्र राखीवमधील कोअर क्षेत्रातील विविध गावांचे तात्काळ पुर्नवसन करावे. अन्यथा १० जूनपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव (नागपूर) यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या चार जिल्ह्यात वसला आहे. व्याघ्र प्रकल्प हद्दीत काही अतिदुर्गम गावे, वाड्या-वस्त्या आहेत. संबंधित कोअर क्षेत्रात वसलेल्या काही गावांचे पुर्नवसन झाले आहे. मात्र काही गावांचा गेल्या कित्येक वर्षांपासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यामध्ये मौजे देऊर, वेळे, ढेण, तळदेव, मायणी, खिरखंडी, मळे, कोळणे, पाथरपुंज तसेच खुंदलापूर (धनगरवस्ती), गोठणे व कुंडी या गावात लोकांचे वास्तव्य आहे. 

वन - पर्यावरण कायद्याचे उल्लंघन ?

या गावातील लोकांचे जीवन हे जंगलावर अवलंबून असते. ते वनौपज गोळा करण्यासाठी, घरे बांधण्याकरिता लाकडे आणण्यासाठी, कोअर क्षेत्रातील घनदाट जंगलात जात असतात. दरम्यान, त्यांच्याकडून वन - पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होऊन जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावेळी संबंधित व्यक्तींवर जंगली हिंस्त्र श्वापदांचे अनेकवेळा हल्ले होतात. त्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागतो. 

नागरी सुविधा उपलब्ध नाहीत

ही गावे कोयना अभयारण्याच्या गाभा क्षेत्रामध्ये येत असल्याने या गावांमध्ये कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत. या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो तात्काळ मार्गी लावावा. तसेच जल, जंगल, जमीन या संसाधनांचे संरक्षण करुन वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करण्यात यावे. या सर्व गावांची माहिती घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उचित कारवाई ९ जूनपर्यंत करावी. अन्यथा १० जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे सुशांत मोरे यांनी म्हटले आहे. 

नवजा कॉरिडॉरबाबत स्पष्टता करा

कोयना प्रकल्पातून १९७२ साली कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून जी जमीन वाटप झाली आहे, ती जमीन निर्विकरण करुन जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली आहे. परंतु अधिसूचनेमध्ये वनविभागाचे निर्बंध असल्याचे दिसून येते, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना त्या जमिनीवर कोणताही व्यवसाय, कर्ज काढून उपजीविका करता येत नाही, त्यामुळे अधिसूचनेमधून तो भाग वगळावा किंवा त्या त्या खातेदारांच्या मागणीनुसार वनविभागाने त्यांना पुनर्वसनाचा लाभ द्यावा असे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह विविध विभागाचे सचिव, विविध जिल्ह्यांचे अधिकारी, सातारचे जिल्हाधिकारी, उपसंचालक (कोयना) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना देण्यात आल्या आहेत. 

वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची तात्काळ मदत द्या...

राज्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव-वन्यजीव संघर्षामध्येही वाढ होत आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्याघ्र प्रकल्प बफर व कोअर क्षेत्रातील नागरिक अनेकदा जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. त्यासोबतच अनेकदा नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर वन्यजीव हल्ला करतात. या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही मोरे यांनी केली आहे.

Sahyadri Tiger Reserve, Chief Minister of Maharashtra, Satara Collector

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या