बोरगावात सहा वर्षांपूर्वी घडली होती घटना; सातारा न्यायालयाचा निकाल
Satara News : सातारा तालुक्यातील बोरगाव येथे सहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका रानटी कृत्याबद्दल सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे. या घटनेत मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
विजय तातोबा साळुंखे (वय ६५, रा. बोरगाव, ता. जि. सातारा) असे मृत्यू पावलेल्याचे नाव असून विशाल प्रल्हाद शितोळे (वय २३, रा. आंबेवाडी, ता. जि. सातारा) असे शिक्षा लागलेल्या आरोपीचे नाव आहे.
विजय साळुंखे यांचा मृत्यू
ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना १३ ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास बोरगाव येथील पुलाखाली घडली होती. त्यावेळी आरोपी विशाल शितोळे हा त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या फोडत होता. त्यामुळे बाटल्या फोडून काचा कशाला करतोस असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जाऊन आरोपीने विजय साळुंखे, दीपक नामदेव साळुंखे, अनिल शंकर देशमुख व या घटनेतील फिर्यादीवर चाकुने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यापैकी घाव जिव्हारी बसल्याने विजय साळुंखे यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एकाचा खून व इतरांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद नोंदवण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले होते.
११ साक्षी आणि परिस्थितीजन्य पुरावा
हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या कोर्टात चालला. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली वि. पाटील यांनी कामकाज पाहिले. खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांच्या साक्षीवरून तसेच सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्य व न्यायालयात समोर आलेला पुरावा व सरकारी अभियोक्ता यांच्याकडील कथन केलेले पुरावे ग्राह्य मानुन न्या. व्ही. आर. जोशी यांनी आरोपीस भा.द.स. क. ३०४ (II) अन्वये १० वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावास, भा.द.स.क. ३२६ अन्वये ७ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास, भा.द.स.क. ३२४ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा दिली आहे.
पोलीस दलाचे टीमवर्क
सातारा विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार विजय देसाई यांनी व पोलीस नाईक सुनिता देखणे यांनी साक्षीदार हजर करणे व केसचे इतर महत्वाचे कामकाज करणे याकामी विशेष परीश्रम घेतले. याकामी पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार शशिकांत गोळे, पोलीस अंमलदार गजानन फरांदे. पोलीस हवालदार शेख, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते आदिंनी योग्य ती मदत केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या