आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचा बळी; उपचारांअभावी जीव गमावला
Satara News : खटाव तालुक्यातील शिरसवडी गावचा एक चिमुरडा आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणाचा व अनास्थेचा बळी ठरला. सर्पदंश झाल्यानंतर या बालकाला तिथेच उपचार न करता सातारला न्यायला लावल्यामुळे 'गोल्डन अवर' हातून निसटला आणि उपचारांअभावी या बालकाला तडफडून जीव गमवावा लागला.
अथर्व प्रमोद कवळे (वय ५) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घराजवळच हा मुलगा खेळत असताना त्याला सर्पदंश झाला. त्यामुळे त्याने धावत घरात येऊन आपल्याला साप चावल्याचे सांगितले. उजव्या हाताच्या बोटाला सापाचा दंश झालेला होता. लेकराला सर्पदंश झाल्याचे पाहून सर्वजण आरपार हादरून गेले.
तालुक्याच्या ठिकाणीही उपचार नाहीत
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी ताबडतोब वडूजला धाव घेऊन सरकारी दवाखाना गाठला. वास्तविक वडूज हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी सर्पदंशाचे उपचार मिळायला हवे होते. मात्र तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सर्पदंश झालेल्या मुलाला सातारला सिव्हिल रुग्णालयात नेण्यास सांगून जबाबदारी झटकली.
जिथे तिथे अनास्थेची आडकाठी
त्यावेळी 108 क्रमांकाला फोन केल्यानंतर उपलब्ध होणारी ॲम्बुलन्स त्याच दवाखान्याच्या दारात उभी होती. परंतु त्याचा चालक गायब होता. त्यामुळे अथर्वला खाजगी वाहनाने तातडीने सातारला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण त्यातही अनास्थेची आडकाठी आली. खाजगी वाहनाने नेल्यास तिथे दाखल करून घेणार नाहीत, ही ॲम्बुलन्स असेल तरच दाखल करून घेतील असे त्या ठिकाणी सांगितले गेले. या घोळात अर्धा ते पाऊण तास असाच निघून गेला. शेवटी चालक आला, पण डॉक्टर असल्याशिवाय मी घेऊन जाणार नाही, जायचे असेल तर तुमच्या जबाबदारीवर चला असे नवे कोडे त्याने घातल्यामुळे आणखी काही वेळ गेला. तिथून सातारला पोहोचण्यात आणखी तासभर गेला.
गोल्डन अवर हातून निसटला
भीषण अपघात असो, की प्राणघातक सर्पदंश असो... रुग्णाला कमीत कमी वेळेत उपचार मिळाल्यास त्याचा प्राण वाचू शकतो. त्यादृष्टीने घटनेनंतरचा 'गोल्डन अवर' अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र या घटनेत सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आणि अनास्थेमुळे जो गोल्डन अवर हातून निसटला, त्यामुळे उपचाराअभावी तडफडून अथर्वचा मृत्यू झाला. या कोवळ्या निष्पाप बालकाचा हकनाक बळी गेला.
अथर्वचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रचंड धावपळ केलेल्या जवळच्या माणसांचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता. सरकारी आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेबद्दल त्यांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या