Satara News : राजांनी भाजपला जाब विचारावा


संसदेबाहेरील महापुरुषांचे पुतळे हटवल्यावरून लक्ष्मण माने आक्रमक

Satara News : संसदेच्या दर्शनी भागातील महापुरुषांचे पुतळे अडगळीत टाकल्याबद्दल सातारच्या दोन्ही राजांनी केंद्रातील भाजप सरकारला रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे व हे पुतळे मूळ स्थितीत यावेत यासाठी देशव्यापी आंदोलन उभे करून त्याचे नेतृत्व या दोघांनी केले पाहिजे. हे शक्य नसेल तर त्यांनी भाजपचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, अशी कडक भूमिका उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी मांडली आहे.

सातारा येथील श्रावस्ती सांस्कृतिक संकूलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर उपस्थित होते.

भाजपकडून महापुरुषांचा अवमान

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे लोकसभेच्या दर्शनी भागात असलेले पुतळे भाजप सरकारने कुठल्यातरी हॉलमध्ये अडगळीत टाकले आहेत. हे महापुरुष केवळ महाराष्ट्राचे नव्हेत, तर ते संपूर्ण देशाची अस्मिता आहेत. जात, धर्म, पंथ, लिंग या सर्व भेदनितीच्या पलीकडे त्यांनी राष्ट्र उभे केले. या देशातील गुलामगिरीला चुड लावली. समताधिष्ठित समाजरचनेचे स्वप्न पाहिले, त्यांचे पुतळे हे केवळ पुतळे नाहीत ते आम्हा तमाम देशवासियांचे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे पुतळे उचलून भाजपने त्यांचा अवमान केला आहे, अशा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत माने यांनी याचा निषेध केला आहे.

अन्यथा वारसा सांगण्याचा अधिकार नाही

सातारा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे आणि या राजधानीतील आणि राजघराण्यातील दोन राजे भाजपमध्ये आहेत. हे पुतळे मूळ जागेवर प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरुन शासनाला जाब विचारला पाहिजे व पुतळे मूळ स्थितीत यावेत यासाठी देशव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे व त्याचे नेतृत्व या दोघांनी केले पाहिजे. आणि हे शक्य नसेल तर भाजपचा राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे. अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार या दोघांना राहणार नाही असे त्यांनी बजावले. 

... तर २२ जुलैला लाक्षणिक उपोषण

दि. २२ जुलैला संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे, तोपर्यंत छत्रपतींचे वारसदार म्हणून आमच्या या दोन्ही मित्रांनी याप्रकरणी ठोस भूमिका न घेतल्यास त्या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कचेरीपुढे आपण लाक्षणिक उपोषण करणार आहे असे स्पष्ट करत, या उपोषणास सर्व शिव, शाहू, फुले, आंबेडकरवादी, गांधीवादी नागरिकांनी सहभागी होवून आपला निषेध नोंदवावा असे आवाहन लक्ष्मण माने यांनी यावेळी केले. 

Parliament of India, Chhatrapati Shivaji Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Gandhi, Chhatrapati Udayanraje Bhosale, Chhatrapati Shivendrasinhraje Bhosale

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या