Satara News : डीपीयू हॉस्पिटलचे साताऱ्यात पाऊल


‘हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण’ प्रक्रियेसाठी बाह्यरुग्ण विभाग

Satara News : हृदय आणि फुफ्फुसाच्या अतिगंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी (पिंपरी, पुणे) येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे साताऱ्यामधील दोन ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरु होत आहेत. या सुविधेमुळे हृदय व फुफ्फुसांसंबंधीत रुग्णांना तज्ञांचे समुपदेशन व मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. 

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे फुफ्फुस प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ डॉ. राहुल केंद्रे, डॉ. समीर चौहान, कार्डियोवैस्कुलर थोरॅसिक सर्जन उपस्थित होते.

सातारा परिसरातील रुग्णांना लाभ

हार्ट लाईन डायग्नोसीस्ट प्रा. लि. उतेकर नगर, सदर बाजार, सातारा (अध्यक्ष - डॉ. रमेश चौगुले, व्यवस्थापकीय संचालक - डॉ. वर्षा कुलकर्णी) आणि प्रतिभा हॉस्पिटल, जिल्हा परिषदेजवळ, सातारा (हृदयरोगतज्ज्ञ - डॉ. सोमनाथ साबळे, श्वसनविकार तज्ञ - डॉ. संजय साठे) येथे हे बाह्यरुग्ण विभाग सुरु होत आहेत.

या ओपीडीद्वारे सातारा आणि आसपासच्या भागातील रुग्णांना फायदा होणार आहे. तसेच ऑक्सिजनवर अवलंबून किंवा अतिगंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर काहीवेळा अवयव प्रत्यारोपण सुद्धा करावे लागतात. त्याकरिता महाराष्ट्रातील रुग्णांना हैदराबाद, चेन्नईमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात. ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. परंतु पुण्यातील डीपीयू हॉस्पिटलमध्ये आता या प्रत्यारोपणाच्या सर्व सेवा सुविधा, अनुभवी कुशल डॉक्टरांच्या टीम उपलब्ध असल्याने वेळ व पैशाची बचतदेखील होईल. त्यामुळे सातारा परिसरातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.

सेवांची माहिती होणे गरजेचे

फुप्फुससंबंधी दुर्धर, बऱ्या होऊ न शकणाऱ्या, कोविडमुळे लंग फ्रायबोसीस झालेल्या, अंथरुणावर खिळलेल्या तसेच ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार व फुप्फुस किंवा हृदय प्रत्यारोपण सुविधा आणि यासंबंधी आजारांबाबत देखील मार्गदर्शन व प्रत्यारोपण सेवांची लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे.

महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया 

तीन महिन्यांपूर्वी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे साताऱ्यातील एका ५४ वर्षाच्या महिलेवर यशस्वी दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आले. सातारा येथील ही पहिली दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. रुग्णाला एक कौटुंबिक लंग फायब्रोसिस आजार होता, जो त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांना सुद्धा होता. या आजारामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. गेली २ वर्षे रुग्ण ऑक्सिजनवर अवलंबून होते आणि तेव्हा त्यांना जवळजवळ ६ लीटर प्रति मिनिट ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. परिणामी त्या अंथरुणाला खिळल्या होत्या आणि दैनंदिन कामांसाठी कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावे लागत होते. 

या गुंतागुंतीच्या आजारासाठी रुग्ण साताऱ्यातील डॉ. संजय साठे, श्वसनविकार तज्ञ यांच्याकडे पाठपुरावा करत होता. त्यांनी या रुग्णाला फुफ्फुस प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. या प्रकरणामध्ये रुग्णाला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात डॉ. राहुल केंद्रे, फुफ्फुस प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ आणि डॉ. संदीप अट्टावार, संचालक - हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व किम्स हॉस्पिटल (चेन्नई) यांच्या तज्ञ टीमने रुग्णाला पहिल्यांदा प्रत्यारोपणासाठी योग्यरीत्या तयार केले आणि नंतर मार्च महिन्यात रुग्णावर यशस्वीरीत्या प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपणानंतर ३ आठवड्याने रुग्णाला घरी सोडण्यात आले असून त्या आता सामान्य जीवन जगत आहेत.

आणखी काही शहरांमध्ये बाह्यरूग्ण विभाग सुरु करणार 

"आरोग्य सेवेतील आधुनिक तंत्रज्ञानाने नाविन्यपूर्ण संशोधनावर आणि प्रक्रियांवर आम्ही नेहमीच भर देत असतो, ज्यामुळे त्याचा अतिगंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना फायदा होतो. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण परिसरातील जनतेला विविध प्रकारच्या  आजारांवर सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आणखी काही शहरांमध्ये विविध ठिकाणी बाह्यरूग्ण विभाग सुरु करण्याचा आमचा मानस आहे.

- डॉ. पी. डी. पाटील,

कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)

अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे रुग्णसेवा

"महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचून हृदय विकार, फुप्फुस प्रत्यारोपण सारख्या गंभीर आजारांवर जनतेला अधिकाधिक दर्जेदार आणि सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी याच उद्दिष्टाने ही ओपीडी सुरु करण्यात आली आहे. आम्ही आरोग्यसेवेमध्ये सतत नवीन आणि आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे रुग्णसेवा जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठी सतत कार्यशील आहोत."

- डॉ. भाग्यश्री पी. पाटील, 

प्र - कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)

अद्ययावत वैद्यकीय सेवेसाठी कटिबद्ध

"वैद्यकीय सेवेचा विस्तार होणे काळाची गरज आहे. त्यामुळे अशा विभागवार ओपीडीच्या माध्यमातून रुग्णाचे आरोग्य हित साध्य व्हावे या दिशेने आम्ही कार्यरत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला जागतिक दर्जाची वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत उत्तम तसेच अद्ययावत वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहोत."

- डॉ. यशराज पाटील, 

विश्वस्त व खजिनदार, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या