दीडशेव्या जयंतीनिमित्त 'संबोधी'तर्फे साताऱ्यात डॉ. वाघमारे यांचे व्याख्यान
Satara News : राजर्षी शाहू छत्रपती हे मनुवाद्यांशी निकराने झुंज देणारे आधुनिक नवसमाज रचनेचे शिल्पकार, लोककल्याणकारी ग्रेट महाराजा होते, असे मत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश इंजे, कार्यवाह ॲड. हौसेराव धुमाळ, विश्वस्त डॉ. सुवर्णा यादव, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, प्राचार्य डॉ. संजय कांबळे उपस्थित होते.
लंडन परिषदेत सहभागाबद्दल सत्कार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' या प्रबंधाच्या शताब्दीनिमित्त लंडन येथे आयोजित केलेल्या जागतिक परिषदेत सहभागी झालेले छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. केशव पवार व तानाजी देवकुळे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांच्या प्रबंधाचे महत्व विषद करून लंडन परिषदेतील अनुभव कथन केले.
डॉ. वाघमारे म्हणाले, शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणाचा ब्राह्मणी वर्चस्ववादाचा कटू अनुभव आला. त्यांनी त्यांच्याशी विवेकाने कठोर मुकाबला केला. शेतकरी, स्त्रीया, वंचित समाजाच्या उत्थानासाठी अखंडपणे असंख्य सामाजिक, शैक्षणिक विधायक कामे करुन पुरोगामी विचार जोपासला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांतील उद्दिष्टांची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तसेच देशाचे मोठे नेते होतील असे द्रष्टे भाकीत महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये व्यक्त केले होते. ते अक्षरशः खरे ठरले आहे.
प्रबोधनकारांकडून वचनपूर्ती
शाहू महाराजांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे चरित्र लिहिण्याचे वचन अखेरच्या समयी घेतले होते. ते प्रबोधनकारांनी पूर्ण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथील बोर्डिंगला महाराजांचे नाव देऊन त्यांच्या विचारांचा वारसा सार्थ केला आहे, असेही ते म्हणाले.
रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. प्रारंभी डॉ. सुधा होवाळे, डॉ. रवींद्र हर्षे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले व जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे माजी सभापती बाळासाहेब शिरसाट यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या